केशव गावित सरांची शिक्षण पद्धती सनी निम्हनांना भावली; राज्य सरकारने हे मॉडेल जिल्हा परिषद शाळेत राबवावे
पुणे- गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या हिवाळी गावातील आदिवासी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची बौद्धिक क्षमता पाहून मला आश्चर्य वाटले. या शाळेतील मुलांना संविधानातील सर्व कलमे तसेच गणिताचे ९९८ पर्यंतचे पाढे तोंडपाठ आहेत. या शाळेतील शिक्षक केशव गावित सरांनी ही किमया घडवून दाखवली आहे. केशव गावित यांचा माध्यमावर आलेला व्हिडीओ पाहून पुणे शहरातील माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी ट्वीट करत राज्यात देखील हे शैक्षणिक मॉडेल राबविण्याची मागणी केली आहे.
आदिवासी पाड्यावरील शिक्षक केशव गावित हे शाळेतील उपलब्ध साधनांचा वापर करून अत्यंत प्रभावी पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम ते मोठ्या तळमळीने करत आहेत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून वारली पेंटींग, इंग्रजी बोलणे आणि कर्सिव्ह लिपीतील लेखन अशा अनेक नवनवीन गोष्टी या मुलांना शिकवत आहेत. तसेच या मुलांना स्वावलंबी बनविण्याच्या दृष्टीने शेतीविषयक कौशल्ये शिकविण्याचे देखील ते काम करत आहेत.
शिक्षक केशव गावित यांनी आदिवासी पाड्यातील शाळेत राबवलेली शिक्षण पद्धती राज्य शासनाने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद शाळेत एक मॉडेल म्हणून राबवली पाहिजे. जेणेकरून सर्व समाज घटकांना या शिक्षण पद्धतीचा फायदा होईल. भारताच्या येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच हा प्रयोग उपयुक्त ठरेल अशी मागणी सनी निम्हण यांनी ट्वीटद्वारे केली आहे.