असंख्य भावांनी दिलेली ओवाळणी मूकबधिर विद्यालयाला सुपूर्द! एका भगिनीचा स्तुत्य उपक्रम!
समाजसेवेच्या आणि चांगल्या कामाचे ध्येय घेऊन काम करणाऱ्या व्यक्तींसाठी वैयक्तिक असे काहीच राहत नाही. याचाच प्रत्यय संगमनेरमधील अनेकांना भाऊबीजेच्या दिवशी आला. समाजसेवेसाठी संगमनेरमधील डॉ. सुधीर तांबे यांच्या संपूर्ण कुटुंबाने स्वतःला झोकून दिले आहे. त्यात भर म्हणून आता त्यांच्या सुनबाईंनी देखील जोड दिली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांनी भाऊबीजेच्या ओवाळणीत आलेल्या रक्कमेत स्वतःकडील रक्कमेची भर टाकून ‘संग्राम मूकबधीर विद्यालयासाठी प्रोजेक्टर आणि स्क्रीन दिली.
आमदार सत्यजीत तांबे यांच्या संगमनेर येथील ‘प्रभा’ या निवासस्थानी भाऊबीजेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरवर्षी दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी आ. सत्यजीत तांबे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्ये भेट घेण्यासाठी येतात. या कार्यकर्त्यांनी हक्काने डॉ. मैथिली यांच्याकडून ओवाळून घेतले. कार्यकर्त्यांचे हे प्रेम पाहून डॉ. मैथिली तांबे भारावून गेल्या.
आपल्या परिवाराच्या अंगी असलेलला समाजसेवेचा वसा डॉ. मैथिली यांनी चोखपणे सांभाळून घेतला आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. मैथिली यांनी ओवाळणीतील ही रक्कम संग्राम मूकबधीर विद्यालयासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण तांबे कुटुंबाने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. कार्यकर्त्यांनी दिलेली भाऊबीजेची ओवाळणी सत्कारणी लागल्याचा आनंद आहे, असे मत डॉ. मैथिली तांबे यांनी व्यक्त केले आहे.