नाशिक महापालिका आयुक्तांची उद्योजकांच्या समस्या सोडवताना लागणार कसोटी!
देशासह राज्यातही बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्योग क्षेत्रात नवीन संधी आणि रखडलेल्या प्रश्नांबाबत उपाय काढणे अत्यंत महत्वाचे आहे. अंबड, सातपूर आणि नाशिक महानगरपालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील उद्योग व उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्योजकांना इंडस्ट्रीप्रमाणेच मालमत्ता कर लागू करावा, MIDC क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण कराव्या, या भागात शौचालयांची, गटारांची सोय करावी, सांडपाणी व्यवस्थापन करण्यास पालिकेने मदत करावी, अशा विविध मागण्या उद्योजकांनी केल्या आहेत.
या बैठकीचे आयोजनासाठी नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेतला होता. नाशिक शहरात प्रचंड क्षमता असून इथे म्हणावा तसा औद्योगिक विकास झाला नाही, असं परखड मत ते कायम व्यक्त करत असतात. सिन्नर MIDC सह नाशिक जिल्ह्यातील अनेक उद्योजकविषयीच्या प्रश्नांवर सत्यजीत तांबे विधासभेत सुद्धा जोरदार बॅटिंग करताना दिसतात. गुरुवारी झालेल्या बैठकीत सुद्धा त्यांनी अनेक प्रश्नांकडे आयुक्तांचे लक्ष वेधून त्यावर ताबडतोब सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली. रोजगार निर्मितीत उद्योजक मोलाची भूमिका बजावत असतात. उद्योजक हेच रोजगार निर्माते असल्याने त्यांचे सर्व प्रश्न आणि समस्या ठरावीक कालमर्यादेत सोडवणे अत्यंत महत्वाचे आहे, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी मत व्यक्त केले आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी नाशिक महापालिका आयुक्तांची कसोटी लागणार आहे, हे मात्र नक्की!