अजब, MPSC चे 3 वेगवेगळे पेपर एकाच दिवशी, या आमदाराने सुनावले खडे बोल!
राज्यात एकाच दिवशी तीन सरकारी परीक्षा होणार असल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या २९ ऑक्टोबरला राज्य लोकसेवा आयोगाची उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा, नगर परिषद भरती परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी ‘महाज्योतीतर्फे’ घेतली जाणारी प्रवेश परीक्षा, या तीन परीक्षा एकाच दिवशी आयोजित केल्या आहेत. यामुळे आता विद्यार्थ्यांना एका दिवशी एकच पेपर द्यावा लागेल आणि इच्छा असूनही दुसऱ्या पेपरला उपस्थित राहता येणार नाही आणि हा एकप्रकारे अन्याय आहे.
यावर समाजमाध्यमातून तीव्र पडसाद उमटले आहेत. नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे याविषयावरून सरकारवर चांगलेच भडकले.
त्यांनी ट्विटर वरून एक आक्रमक अशी पोस्ट लिहून सरकारला जाब विचारला आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात “रात्रंदिवस मेहनत करून मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. राज्यभरात पेपरफुटीचा घोळ सुरु असतानाच आता एकाच दिवशी तीन परीक्षा होणार असतील तर देशात नवीन बेरोजगारांची संख्या वाढेल. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा विचार करून या परीक्षांच्या तारखेत बदल करावा”
विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे सत्यजीत तांबे सोशल मीडिया व मीडियावर सुद्धा आक्रमकपणे बाजू मांडत असतात. त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक कार्यवाही होईल की नाही हे येणारा काळ ठरवेल.