हटकेश्वरचा – हटके ट्रेक ! – डॉ. अनुष्का शिंदे
श्रावण महिना पण पावसाने पूर्णपणे दडी मारली होती. २० ऑगस्ट २०२३ रोजी शिवनेरी ट्रेकर्स ट्रेकला निघाले; हटकेश्वरच्या ! १९ ऑगस्टपर्यंत पाऊसच नाही व ट्रेकच्या दिवशी सकाळी पावसाला सुरुवात झाली. धुकं आणि शॉवर सारखा पाऊस असल्यामुळे घराच्या आजूबाजूलाच हटकेश्वरचा फील यायला लागला. एवढ्या पावसात काय ट्रेक करणार? असा प्रश्न मनात भेडसावू लागला पण अध्यक्षांच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावर जायचा निर्णय घेतला. लहानपणापासून नेहमीच कुतूहल वाटत असलेला ‘वराडी डोंगर’ या निमित्ताने पाहायला मिळणार होता.
हटकेश्वर अर्थात शंकर भगवान! हटकेश्वरला गोद्रे, आलमे, गणेशखिंड, कोल्हेवाडी या चार मार्गे आपण जाऊ शकतो. हटकेश्वराचा उल्लेख नवनाथ ग्रंथात आहे व असे म्हटले जाते की, तीन वेळा हटकेश्वर केले की काशी केल्याचे पुण्य मिळते.हटकेश्वर हा एकसंध असून तो लेण्याद्रीच्या डोंगररांगांना भिडला आहे. हा ट्रेक पावसाळ्यात व हिवाळ्यात करू शकतो. आमची ३३ जणांची टीम १२ महिला २१ पुरुष गोद्रे मार्गे हटकेश्वरावर जाण्यासाठी सज्ज झाले. नऊ वर्षाच्या छोट्या ट्रेकर्सपासून ते ७४ वर्षांच्या अँग्री यंग मॅनपर्यंत सर्वजण उत्सुक होते.
सोसाट्याचा वारा, ऊन, पाऊस, थंडी, धुकं सारं काही अनुभवत आम्ही एक – एक टेकडी पार करत होतो. मागील वर्षाच्या अमरनाथ ट्रीपची यावेळी आठवण झाली. साधारण अडीच तासाचा हा चढण्याचा ट्रेक होता. विविध रंगी रंगलेले… इव्हेंट मॅनेजमेंटला देखील लाजवेल असे रानफुलांचे गालिचे, झुळझुळणारे झरे या झऱ्यांमधून वाट काढत आम्ही वर जात होतो. नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतातून वर जाताना त्या स्वच्छंदी पाण्याचा पायाला होणारा स्पर्श काही वेगळाच आनंद देऊन जात होता. नंतर चिकन मातीचे सपाट पठार लागले व सर्वजण आम्ही फारच जपून – जपून चालू लागलो. या कसरतीमध्ये मंदिरापाशी केव्हा पोहोचलो समजलेच नाही. मंदिराचे भिंतीचे थोडेसे अवशेष आहेत व त्याला पत्र्याचे शेड केले आहे. पिंड मोठी व बाजूला एक नैसर्गिक उपळ आहे, ज्यातून पिंडीवर सारखा पाण्याचा अभिषेक चालू असतो. मंदिर, मंदिरातील थंडावा व बाहेर असलेले खूप सारे नंदी पाहून सर्व थकवा निघून जातो.
या हटकेश्वराला “सोन्याचा डोंगर” असे देखील म्हटले जाते. हटकेश्वरावरून लेण्याद्री, शिवनेरी, चावंड, पिंपळगाव- जोगा धरण ही नैसर्गिक ठिकाणे पाहायला मिळतात. सर्वांचे दर्शन झाल्यावर आम्ही पुढे गेलो सर्वांनाच उत्सुकता होती डोंगरातील गुहा जिला ‘साळुंकीची गुहा’ म्हणून ओळखले जाते, ती पाहण्याची. तसेच जुन्नर तालुक्यात केवळ दोन नैसर्गिक पूल आहेत त्यापैकी एक हटकेश्वर चा नैसर्गिक पूल, तो पाहण्याची. पण धुके इतके प्रचंड होते की पूल अगदी धूसर दिसत होता व रस्ता निसरडा असल्यामुळे गुहेकडे जाऊ शकत नव्हतो. डोंगरावरून खाली पूर्ण समुद्र आहे असा भास होत होता. दुपारचे एक वाजले होते. सर्वांनाच कडकडून भूक लागलेली; वरून पाऊस पडत होता व आम्ही सर्वजण वन – भोजनाचा आनंद घेत होतो. जेवण झाल्यावर परतीचा प्रवास चालू झाला. ट्रेक लीडर अनिल काशीद व अध्यक्ष निलेश खोकराळे जबाबदारीने आम्हा सर्वांना खाली घेऊन आले. खाली येताना “साळुंकीची गुहा व नैसर्गिक पूल” पाहण्यासाठी परत एकदा हटकेश्वरला यायचे हा विचार घेऊन घरी परतले. हटकेश्वरचा असा हा हटके ट्रेक अनुभवायची हि संधी या निमित्ताने मिळाली.