आमदार व त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य सोप्प नसतं, व्हायरल पोस्टने नेटकरी सुद्धा भारावले!
प्रतिनिधी
आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोज काबाडकष्ट करणारा बाप दमून घरी येतो, तोपर्यंत घरातील लहान मुलं झोपलेली असतात व सकाळ व्हायच्या आधीच बाप पुन्हा कामावर रुजू होतो. या व्यस्त नियोजनामुळे महिन्यातून 5/6 वेळाच मुलांची व बापाची भेट होते. पण राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या बापाची गोष्ट याहून थोडी वेगळी असते. सततचे दौरे, अधिवेशन, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात पाठपुरावा, प्रचार व जनसंपर्क यातून लोकप्रतिनिधिंचं खासगी आयुष्य उरत नाही! त्यांना आपल्या मुलांना सुद्धा भेटन शक्य होत नाही.
सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले व आपली मतं अभ्यासू पद्धतीने मांडणारे अशी ओळख असलेले नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांची एक पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे.
महिन्यातले २०-२५ दिवस दौऱ्यांसाठी बाहेर असलेला राजकीय नेता घरी येतो, तेव्हा त्याची लहान मुलं त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी कशी धडपडतात, हे वाचून अनेकांनी सत्यजीत तांबे यांनी आपलीच व्यथा मांडल्याची भावना व्यक्त केली.
आ. सत्यजीत तांबे यांनी आपल्या दीड वर्षांचा लहान मुलगा सूर्या याच्या बरोबरचा एक फोटो ट्वीट केला. या फोटोत लहानगा सूर्या आ. तांबे यांचं बोट पकडून त्यांना आपल्याकडे खेचतोय. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, पाच जिल्ह्यांचे सततचे दौरे, भेटीगाठी, बैठका करून काल बऱ्याच दिवसांनी घरी पोहोचलो. महिन्यातून २४-२५ दिवस घराबाहेरच राहावे लागते. त्यामुळे मुलांना वेळ देणं शक्य होत नाही. अनेक दिवसांनी घरी येऊन फक्त एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडताना आमदार सत्यजीत तांबे यांच्या मुलाने त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट केला. शेवटी या बालहट्टापुढे हार मानत आ. तांबे यांनी वेळात वेळ काढून लहानग्या सूर्यासोबत एक फेरफटका मारला.
यापुढे त्यांनी लिहिलंय की, त्यांची मुलगी अहिल्या तर ते घरी पोहोचल्यावर त्यांचा मोबाईल लपवून ठेवते. घरी आल्यावर तरी बाबांनी आपल्यासोबत वेळ घालवावा, यासाठी ती ही युक्ती लढवते. या पोस्टमध्ये आ. तांबे यांनी आपल्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांचंही प्रचंड कौतुक केलं आहे. डॉ. मैथिली आपलं काम सांभाळून घराकडे लक्ष देतात, म्हणून मला माझी कामं शांतपणे कोणतीही चिंता न करता पार पाडता येतात, असं आ. तांबे यांनी म्हटलं आहे.