मालिका विजयानंतर हार्दिक पंड्याने केलं मोठं वक्तव्य; म्हणाला,’माझा एक सरळ साधा नियम आहे…’
भारत आणि न्यूझीलन्ड यांच्यातील टी-२० मालिका भारताने आपल्या नावे केली आहे. या मालिकेत अंतिम सामन्यात भारताने विक्रमी विजय साकारत किवी संघाला केवळ ६८ धावांवर ऑल आऊट केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने चांगली कामगिरी करत २० षटकात ४ गडी गमावून २३४ धावा केल्या. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली आणि सामना १६८ धावांनी गमावला. त्याचवेळी भारताच्या या दमदार विजयानंतर कर्णधार पांड्या काय म्हणाला, पाहूया.
सामन्यानंतर कर्णधार पंड्या म्हणाला की, त्याला स्वत:च्या अटींवर सामने खेळायला आवडतात. पण पंड्याने मालिकावीर म्हणून ट्रॉफी स्वीकारल्यानंतर ती ट्रॉफी सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असल्याचे म्हणाला. तो म्हणाला की ‘हा (प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार) जिंकायला माझी हरकत नाही, पण इथे अनेक लोक होते, ज्यांची कामगिरी असाधारण होती. मी या मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला ही ट्रॉफी समर्पित करतो. या सर्वांसाठी मी खूप आनंदी आहे.’
हार्दिक पांड्या म्हणाला, “खरं सांगू तर मी नेहमी याचप्रमाणे खेळतो, मी आधी हे समजून घेतो कि कोणत्या गोष्टीची गरज आहे. मी आधीच काही विचार करून ठेवत नाही. माझ्या कर्णधारपदात मला गोष्टी सर्वसाधारण ठेवायच्या आहेत. माझा एक साधा नियम आहे, जर मी हरलो तर मी माझ्या अटींवर हरेन. आम्ही आव्हाने स्वीकारण्याबद्दल बोललो आहोत. जेव्हा आम्ही आयपीएल फायनल खेळलो तेव्हा आम्हाला वाटले की दुसरी इनिंग अधिक रंगतदार असेल, परंतु आज या खेळपट्टीवर, मला तो एक सामान्य सामना बनवायचा होता कारण तो महत्त्वपूर्ण होता. त्यामुळे आम्ही प्रथम फलंदाजी केली. आशा आहे की आम्ही अशा प्रकारची कामगिरी कायम ठेवू शकू.”
किवी संघाविरुद्धच्या या सामन्यात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. यादरम्यान गिलने ६३ चेंडूत १२६ धावा केल्या. ज्यामध्ये १२ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. तर राहुल त्रिपाठीने देखील २२ चेंडूत ४४ धावांची वादळी खेळी केली. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली. भारताच्या कर्णधाराने सर्वाधिक चार विकेट्स घेतले. त्याच्यासोबतच उमरान मलिकने (२/९), शिवम मावी (२/१२) आणि अर्शदीपने (२/१६) यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले.