उद्योगविश्वात खळबळ! ‘सोलार इंडस्ट्रिज’ कंपनीचा डेटा हॅक; सीबीआय करणार तपास
देशातील नामांकित ‘सोलार इंडस्ट्रिज’ कंपनीचा महत्त्वपूर्ण डेटा सायबर हॅकरने हॅक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून सायबर सेलने गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय)देण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदासपेठ येथे सोलार इंडस्ट्रीजचे कार्यालय आहे. याशिवाय, बाजारगाव परिसरात त्यांचा कारखाना आहे. कंपनीद्वारे शस्त्रे, स्फोटके यासह विविध क्षेत्रांतील उत्पादने तयार करण्याचे काम केले जाते. त्यातूनच कंपनीचे देशाच्या संरक्षण विभागाशी अनेक महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी कंपनीच्या रामदासपेठ येथील कार्यालयात सायबर हॅकरद्वारे त्यांचे संकेतस्थळ हॅक केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, त्यातून ‘२ जीबी’ डाटा चोरल्याची माहिती कंपनीने दिली. त्यांना एक लिंकही पाठविली. ती ओपन करण्यास सांगण्यात आले. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ती ओपन न केल्यामुळे हॅकरच्या माध्यमातून ‘प्रोटोन’ मेल पाठविण्यात आला. त्यात ७२ तासांत मेलमध्ये दिलेल्या सर्व सूचना मान्य करण्याचे नमूद करण्यात आले.
दरम्यान, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सायबर सेलकडे २१ जानेवारीला तक्रार नोंदविली. सायबर सेलने त्याबाबत तपास केला असता, हॅकरद्वारे कंपनीचा डेटा चोरण्यात आल्याचेही समोर आले. त्यातून सेलद्वारे आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला.