विजयासह भारताने रचला इतिहास, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा पराक्रम
भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय साकारला. पण भारतासाठी हा विजय सर्वात महत्वाचा असेल. कारण या विजयासह भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
भारताने शुभमन गिलच्या नाबाद १२६ धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडपुढे २३५ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडचा संघ मैदानात उतरला खरा, पण त्यांची ४ बाद ७ अशी दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी भारत हा सामना जिंकणार, हे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर भारताने न्यूझीलंडचा डाव फक्त ६६ धावांवर आटोपला. त्यामुळे भारताने यावेळी १६८ धावांची दणदणीत विजय साकारला.
भारताचा हा या वर्षातील सलग दुसरा मालिका विजय ठरला आहे. पण यावेळी भारताने तिसरा सामना जिंकत इतिहास रचला आहे. कारण यापूर्वी एवढा मोठा टी-२० लढतीमध्ये विजय भारताला मिळवता आला नव्हता. भारताने यावेळी १६८ धावांनी विजय साकारला आणि त्यांचा हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी भारताने आयर्लंडच्या संघाला १४३ धावांनी पराभूत केले होते. यावेळी भारताचे कर्णधारपद हे विराट कोहलीकडे होते. पण आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने मोठा विजय साकारला आहे. आजच्या सामन्यात गिल तर चमकलाच, पण गोलंदाजांनीही कमाल केली. कारण भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुवातीासूनच धक्के द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळेच त्यांना हा विजय साकारता आला. गिलनेही या सामन्यात कमाल केली. गिलने या सामन्यात नाबाद १२६ धावांची खेळी साकारली, त्याचे हे टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक ठरले. त्याचबरोबर कर्णधार हार्दिक पंड्याने या सामन्यात गोलंदाजीत दमदार कामगिरी केली. हार्दिकने यावेळी चार विकेट्स मिळवल्या आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याचबरोबर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. हार्दिकला यावेळी अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक या वेगवान गोलंदाजांनी सुयोग्य साथ दिल्याचे पाहायला मिळाले.