पाकिस्तानात महागाईने कळस गाठला, महागाईत सर्वसामान्यांना आणखी एक दणका

पाकिस्तान पुन्हा एकदा अभूतपूर्व आर्थिक संकटाकडे वाटचाल करत आहे. पाकिस्तानात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आधीच गगनाला भिडलेली महागाई आणखी वाढली आहे. त्याचवेळी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने व्याजदर १७ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. कारण देशातील चलनवाढीचा दर ३० टक्क्यांवर पोहोचला आहे.

पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर ३५ रुपयांची वाढ केली आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी इंधन दरवाढीची घोषणा केली आहे. २९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून नवीन किमती लागू झाल्या आहेत. यासह रॉकेल तेल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १८ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले की, पेट्रोलची नवीन किंमत प्रति लीटर २४९.८० रुपये आणि डिझेलची किंमत २६२.८० रुपये प्रति लीटर असेल.

इसाक दार म्हणाले की, गेल्या आठवड्यात पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात लक्षणीय घट झाली आहे. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२२ नंतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढवण्यात आल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय किमती आणि रुपयाचे अवमूल्यन असूनही आम्ही पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार चार उत्पादनांच्या किमतीत किमान वाढ केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

नवीन किमतींच्या घोषणेमुळे पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्याशी संबंधित अफवांना आळा बसेल, अशी आशा दार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ५० रुपयांनी वाढ होऊ शकते, अशा बातम्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा कृत्रिम तुटवडा दिसून आला.

Leave A Reply

Your email address will not be published.