हनिमूनसाठी माथेरानला गेले अन् होत्याचं नव्हतं झालं, तरुणाचा घोड्यावरुन पडून मृत्यू
हनिमूनसाठी माथेरानला गेलेल्या जोडप्यावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. माथेरानला फिरण्यासाठी गेला असताना घोडेस्वारी करताना त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील मोहम्मद अली रोड येथे राहणारे मोहम्मद कासिफ इम्तियाज शेख असं या तरुणाचं नाव आहे.
मोहम्मद शेख त्याच्या पत्नी आणि दोन मित्रांसह माथेरान येथे गेले होते. त्यावेळी सगळेजणं घोडेस्वारीसाठी निघाले होते. मात्र, घोडेस्वारीमुळं एकाला प्राण गमवावा लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघं जण वेगवेगळ्या घोड्यांवर बसले होते. त्यावेळी मोहम्मद यांचा घोडा उधळला आणि धावत सुटला. यात मोहम्मद खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. माथेरान येथील सन अँड शेड हॉटेलजवळ सत्तर मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.
घोड्यावरुन कोसळल्यामुळं कासिफ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या मित्रांनी त्यांना जखमीअवस्थेत माथेरान येथील बी. जे रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यानंतर त्यांना उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांनी दीड तास लागला. अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शेख यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, शेख यांचा मित्र फैजान रोशन हुसेन शेख यांने माथेरान पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणी मृताच्या नातेवाईंकडून कोणतही स्टेटमेंट देण्यात आलेलं नाही. त्यामुळं अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. स्टेटमेंटनंतर घोडे पाळणाऱ्या मालकावर कारवाई होईल, असं सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आहे.
दरम्यान, घोडेस्वारी करताना पर्यटकांनी हेल्मेट घालावे असा नियम आहे. मात्र, तो पाळला जात नाही. अनेक वेळा पर्यटक हेल्मेट वापरण्यास नकार देतात. तसंच, घोडे पाळणाऱ्यांनी पर्यटकांना हेल्मेट न दिल्यास आम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.