डॉ. तांबेंवर टीका करताना शुभांगी पाटलांची जीभ घसरली
नागरिकांनी पाटील यांना चुकीची जाणीव करून दिली भर सभेतून नागरिक उठून गेले
नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या नाशिकमधील प्रचारसभेत त्यांचे भाषण सुरू असताना मध्येच भर सभेतून मोठ्या संख्येने अनेक नागरिक उठून गेल्याचा प्रकार घडला आहे. डॉ. सुधीर तांबे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे त्याचा निषेध म्हणून संबंधित नागरिकांनी ही कृती केल्याचे समजते आहे. नागरिकांनी सभेतून निघून जाण्यापूर्वी पाटील यांना त्यांच्या चुकीच्या शब्दाची जाणीव करून दिल्याचीही माहिती आहे.
सध्या राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पाच मतदारसंघांच्या या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ मात्र चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघात सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा सामना होणार आहे. परंतु शुभांगी पाटील यांच्याकडून काही चुकीची वक्तव्ये होताना दिसत आहेत. या आधीही ‘जळगाव जिल्ह्याने देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली’ या त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता त्यांच्याकडून डॉ. तांबे यांच्यावर व्यक्तिगत टीका करण्यात आल्याचा हा प्रकार समोर आला आहे.
आमदार डॉ. सुधीर तांबे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. अनेक शिक्षक संघटनांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पण तांबे पिता-पुत्र मात्र अतिशय संयमाने व शांततेने प्रचार करताना दिसत आहेत. नम्र व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण मतदारसंघात परिचित असलेले डॉ. सुधीर तांबे यांच्या विरोधात शुभांगी पाटील यांनी अपशब्द काढणे त्यांचा नवखेपणा व अपरिपक्वता दाखवणारी गोष्ट असल्याचे बोलले जात आहे.