नवी मुंबईची प्रदूषणात दिल्लीसह आघाडी, गुरुवारी रात्री नेरुळचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३९३ वर…
आजवर देशात हवा प्रदूषणात दिल्ली आघाडीवर आहे. मात्र आता दिल्लीच्या पंगतीत नवी मुंबई निदर्शनास येत आहे. दिल्लीच्या ढासळत्या प्रदूषणाच्या स्पर्धेत आता नवी मुंबईने देखील नंबर लावला आहे. गुरुवारी रात्री नेरूळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक आत्तापर्यंतच्या सर्वात उच्चांक पातळीवर ३९३ एक्युआय गाठली आहे.
दिल्लीच्या पश्चिम भागांत ३८३ एक्युआय, तर शदिपूरमध्ये ४२४ एक्युआय होता. दिवसेंदिवस नवी मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात अडकली जात असून आता दिल्लीतील हवा प्रदूषणाशी जणू स्पर्धाच करू लागल्याचे चित्र दिसत आहे. नवी मुंबई शहरात मागील काही वर्षांपासून प्रदूषणाची पातळी वाढत असून हवा गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे.
AQI (Air Quality Index)हवा गुणवत्ता निर्देशांक २०० ते ३०० एक्युआयहून अधिक आढळत आहे. मात्र, मागील एक आठवड्यापासून शहरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हवेत धुके दिसत असून उग्र दर्पवास येत आहे. त्याचबरोबर, शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक हे वाढत आहे. मागील आठवड्यात वाशीतील हवा गुणवत्तेने सर्वाधिक प्रदूषित पातळी गाठली होती. मागील आठवड्यात वाशीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३५२ वर होता, तेच काल गुरुवारी शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर धुके दिसत होती.
नेरूळ येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३९३ म्हणजेच चारशेकडे वाटचाल सुरू झाली आहे, तेच वाशीमध्ये ३७२ एक्युआय नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे शहरातील हवा गुणवत्तेकडे सपशेल दुर्लक्ष होत असून दिवसेंदिवस प्रदूषित हवा नागरिकांच्या आरोग्यासाठी अतिघातक ठरण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्ण तसेच वयोवृध्द नागरिकांची दमछाक होणार आहे.