कलिनचा सुकेशवर गंभीर आरोप म्हणाली “माझं करिअर उद्ध्वस्त…

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे २०० कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरण आता वेगळंच वळण घेऊ लागलं आहे. अलीकडेच जॅकलीनने गँगस्टर सुकेश चंद्रशेखर विरोधात पटियाला कोर्टात जबाब नोंदवला आहे. यावेळी अभिनेत्री म्हणाली की, सुकेशने तिच्या भावनांशी खेळून तिचं करिअर आणि खासगी आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त केलं. याबरोबरच तिला सुकेशचं खरं नावसुद्धा माहीत नसल्याचं जॅकलिनने स्पष्ट केलं. गेले काही महीने हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे.

जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात नुकतंच पटियाला कोर्टात हजर केलं होतं. यादरम्यान तिने न्यायालयासमोर तिची बाजू मांडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनने दावा केला की, सुकेश चंद्रशेखर हा सरकारी अधिकारी असल्याबद्दल तिला माहिती होती. शिवाय पिंकी इराणीने तिच्या मेकअप आर्टिस्टला हेदेखील पटवून दिले की ती गृह मंत्रालयातील अधिकारी आहे. इतकंच नव्हे तर सुकेशने स्वत:ला सन टीव्हीचा मालक आणि जे जयललिता ही त्याची मावशी असल्याचंही सांगितलं होतं.

या प्रकरणाबद्दल आणि सुकेशशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल बोलताना जॅकलिन म्हणाली, “त्याने मला फसवलं, आणि माझं करिअर उद्ध्वस्त केलं. तो माझा खूप मोठा फॅन आहे आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्याला तिच्याबरोबर काम करायचं आहे असं त्याने मला सांगितलं होतं. दिवसातून किमान ३ ते ४ वेळा आम्ही फोन आणि व्हिडिओ कॉलवर बोलायचो. पण तो जेलमधून मला फोन करायचा याची मला पुसटशीही कल्पना नव्हती.”

तसेच सुकेश चंद्रशेखर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे हे कळल्यानंतरही पिंकीने तिला सांगितले नाही, असेही जॅकलिन म्हणाली. सुकेशने आपले नाव शेखर असे सांगितले होते. जॅकलिन म्हणाली की सुकेशशी तिचे शेवटचे बोलणे ८ ऑगस्ट २०२१ रोजी फोन कॉलवर झाले होते. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधला नाही. त्याच्या या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल जॅकलिनला फार नंतर समजलं असंही तिने यात नमूद केलं. न्यायालयाच्या निर्णयाकडे जॅकलिन च्या चाहत्यांच लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.