पुणे | जुन्नर तालुक्याचे बहुआयामी वैभव छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा शिवनेरी ट्रेकर्सने सुरु केलेला प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून जुन्नरच्या पर्यटन विकासाची एक पाऊलवाट तयार होत आहे, पुढे जावून त्याचा हमरस्ता होणार आहे. पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधा निर्माण करुन जुन्नर तालुका केवळ महाराष्ट्राच्या व देशाच्याच नाही तर जगाच्या नकाशावर येण्यासाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करु, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
शिवनेरी ट्रेकर्स मार्फत येथील बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात आयोजित बहुआयामी जुन्नर छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार कोल्हे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. आमदार अतुल बेनके, पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक विशाल तांबे, अॅड. गफूर पठाण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका अपर्णा डोके, अनुराधा गोफणे, राज्याचे कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाचे राज्य संचालक आनंद भंडारी, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वहाणे, चाईल्ड फंड इंडियाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अभिजीत मदने यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. कोल्हे म्हणाले, छायाचित्र प्रदर्शऩाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचे पर्यटन वैभव राज्यभर पोचविण्याच्या उपक्रम कौतुकास्पद आहे. शिवनेरी ट्रेकर्सच्या कल्पना, संकल्पनांना पुढे घेवून जाण्यासाठी, हे प्रयत्न जगापर्यंत पोहचविण्यासाठी माध्यम म्हणून मी काम करु इच्छितो. अशा कल्पना, संकल्पनांचे कॉपी राईट होणे आवश्यक आहे. जुन्नरमधील बोरी हे गाव जागतिक पर्यटनाचे फार मोठे स्थळ होणार आहे. या व अशा प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करु.
आमदार श्री. अतुल बेनके म्हणाले, राज्यातील पहिला पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर मध्ये निसर्ग व पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीने सुविधा विकसित करण्यात येत आहेत. जुन्नरमध्ये नानेघाट, आंबे हातवीज पठार अशी अनेक ठिकाणे आहेत. येडगाव धरणाजवळ यशवंतराव चव्हाण पर्यटन स्थळ, शिवनेरी पायथ्याशी शिवसृष्टी, जमीन, पाणी व हवा या तिन्ही प्रकारच्या साहसी खेळांचे प्रशिक्षण देणारी मांदरणे येथील 90 एकर क्षेत्रावरील गिर्यारोहण संस्था अशा उपक्रमांचा समावेश आहे. शिवनेरी ट्रेकर्सने आयोजित केलेले उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत. ते पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शिवजयंती निमित्त आयोजित शिवनेरी मॅरेथॉन हा देशपातळीवरील अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यात राज्यभरातील जुन्नरकर व शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आ. बेनके यांनी यावेळी केले.
शिवनेरी ट्रेकर्स मार्फत राबविण्यात येत असलेले शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण, शालेय आपत्ती निवारण प्रशिक्षण, दुर्गसंवर्धन, ट्रेकिंग व गिर्यारोहण मोहिमा, आगामी प्रदर्शने आणि येत्या शिवजयंती निमित्त 12 फेब्रुवारी रोजी जुन्नरमध्ये भरविण्यात येणारी राज्यस्तरीय शिवनेरी मॅरेथॉन याविषयी संस्थेचे सचिव संतोष डुकरे यांनी यावेळी माहिती दिली. पुण्यापाठोपाठ नाशिक (18 व 19 फेब्रुवारी), नागपूर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे आदी आदी ठिकाणी बहुआयामी जुन्नर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ.अनुष्का शिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. संतोष डुकरे यांनी प्रास्ताविक केले. सौ. तेजल वायाळ यांनी आभार प्रदर्शन केले. बालगंधर्व कलादालनातील या प्रदर्शनाचा मंगळवारी (ता.17) रात्री समारोप करण्यात आला.
– काळे, मोरे, बाम्हणे यांना शिवनेरी छायारत्न पुरस्कार
छायाचित्रकला क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दलच्या राज्यस्तरीय शिवनेरी छायारत्न पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नाशिक येथील महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राचे वरिष्ठ छायाचित्रकार सतीश काळे, रत्नागिरी येथील वन्यजीव छायाचित्रकार निखिल मोरे आणि जुन्नर येथील निसर्ग छायाचित्रकार शांताराम बाम्हणे यांना खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.