कोथरूडच्या तुलनेत’आयट हब’ लोकप्रिय; फ्लॅट खरेदीसाठी आयटी हबला मिळतेय ग्राहकांची पसंती!
हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडीसह पुण्याच्या पूर्व भागातील कोरेगाव पार्क, खराडी, विमाननगर, मुंढवा, लोहगाव या ‘आयटी हब’ असलेल्या परिसरात सध्या घर खरेदीसाठी सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात पुणे आणि परिसराच्या बांधकाम क्षेत्राचा झपाट्याने विस्तार झाला असून, कोथरूडपेक्षाही अधिक पसंती सध्या ‘आयटी पार्क’ परिसरातील घरांनाच मिळत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शहरातील सध्याच्या वाहतूक कोंडीला कंटाळून ‘वॉक टू वर्क’ या संकल्पनेला ग्राहकांनी पसंती दिलीय.कामाच्या जवळच्या परिसरात घर घेण्याकडे कल दिसतो आहे.
पुण्यात गेल्या वर्षभरात तब्बल एक लाख घरांहून अधिक सदनिकांची भर पडल्याचे बांधकाम क्षेत्रातील विविध सर्वेक्षण अहवालांतून स्पष्ट झाले होते. यामध्ये हिंजवडी, बाणेर-बालेवाडी यासह पिंपळे सौदागर, वाकड या परिसराला ग्राहकांकडून सर्वाधिक प्राधान्य मिळत असल्याचे समोर आले आहे. खराडी, विमाननगर आणि विश्रांतवाडी या भागांमध्येही सध्या फ्लॅट खरेदीमध्ये वाढ झाली आहे. या सर्व भागांमध्ये अलीकडच्या काळात सर्वाधिक नोकऱ्यांची निर्मिती झाली असल्याने या ठिकाणी नव्याने होणाऱ्या बांधकामांची आणि तेथे उपलब्ध होणाऱ्या सदनिकांची संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ‘आयटी’ क्षेत्राचा परिसर आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात काम करणारा नोकरदार वर्ग या भागामध्ये खरेदी करण्यासाठी उत्सुक असून, त्याच्या खिशाला परवडतील, अशा किमतीची घरे उपलब्ध होत असल्यानेही या भागांकडेच सध्या ओढा जास्त आहे.
या वर्षाही कदाचित हाच ‘ट्रेंड’ कायम राहण्याची शक्यता बांधकाम व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. येत्या वर्षात आयटी क्षेत्रात खूप मोठी मंदी आली आणि नागरिकांचे उत्पन्न कमी झाले, तरच खरेदी-विक्रीच्या प्रक्रियेला खीळ बसेल, अशी शक्यता आहे.