टीम इंडिया कसोटी नंबर १! पण २ तासांतच निराशा….

भारतीय संघाला आज एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकावं लागलं आहे. दुसरीकडे आयसीसीने भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट वृत्त दिलं आहे. आयसीसीने दोन तासांत दुसऱ्यांदा कसोटी संघाची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसलाय. कारण ठरलं आयसीसीच्या वेबसाईटमधील मोठा घोळ…!

 

आयसीसीने आज दुपारी दीड वाजता कसोटी संघाची ताजी क्रमवारी जाहीर करताना टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत नंबर-१ म्हणून घोषित केले होते. परंतु आयसीसीने आता पुन्हा एकदा दुपारी ४ वाजता कसोटी क्रमवारी जाहीर केलीये. या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा १२६ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आला असून टीम इंडिया ११५ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

 

आयीसीच्या वेबसाईटवर भारतीय संघ अव्वल स्थानी दिसल्यानंतर भारतीय संघाच्या लाखो क्रीडा रसिकांनी ट्विट करत आनंद साजरा केला. पण त्यांचा आनंद काही काळापुरातच टिकला. रँकिंगमधील बदल हा आयसीसीच्या वेबसाइटमधील एका चुकीमुळे झाला होता. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघेही सध्या कोणत्याही कसोटी मालिकेचा भाग नाहीत. पुढील महिन्यात उभय संघांमध्ये सामने होणार आहेत.

 

दुसरीकडे टी-२० क्रमवारीत भारत आधीच पहिल्या स्थानावर आहे. त्याचवेळी, एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ ११० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. टीम इंडिया आता १८ जानेवारीपासून मायदेशातच एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मालिका जिंकून भारतीय संघाकडे अव्वल स्थान गाठायची सुवर्णसंधी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.