राज ठाकरे यांना अंगावर घेणारा भाजप खासदार महाराष्ट्रात फसला; शिवरायांचा इतिहास सांगताना बृजभूषण चुकले…
मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, खासदार रामदास तडस हे उपस्थित आहेत. महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात होणार आहे. अंतिम लढतीपूर्वी मान्यवरांनी उपस्थित कुस्ती शौकिनांना संबोधित केलं. यावेळी खासदार बृजभूषण शरण सिंह हे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातीलं नातं सांगत होते. त्यावेळी बृजभूषण शरण सिंह छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीचा दाखला देत होते. यावेळी त्यांच्याकडून एक चूक झाली आहे. बृजभूषण शरण सिंह यांनी यावेळी बोलताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख करण्याऐवजी शाहू असा उल्लेख केला.
भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह काय म्हणाले? “मी महाराष्ट्राच्या समस्त जनतेला अभिवादन करतो. जे उत्तर भारतीय पुण्यात आहेत त्यांना देखील प्रणाम करतो. माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगायचं आहे की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा संबंध आजचा नाही”. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबानं आग्रा येथे दगाबाजीनं कैद केलं होतं. तेव्हा उत्तर प्रदेशच्या लोकांनी, आग्रा येथील जनतेनं शाहूजी महाराजांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात पाठवण्याचं काम केलं होतं”, असं बृजभूषण शरण सिंह म्हणाले.
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रचा संबंध आजपासून नाही, तो शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. शिवाजी महाराजांचा सन्मान आम्ही करतो कारण ते एका धर्माला पाहत नव्हते. प्रगत असो मागास असो, श्रीमंत असो गरीब असो, हिंदू असो मुस्लीम असो ते सर्वांना सोबत घेऊन चालायचे. त्यामुळं मी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला अभिवादन करतो, असं बृजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं.