काँग्रेस, भाजप, शिवसेना ते शिंदे गट! ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षात जातोय हा नेता
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. यात या पक्षाकडून त्या पक्षात उड्या मारण्याचा खेळ आता जोरात सुरू होईल. या खेळात काही गमतीदार नेते सामील होत आहेत गमतीदार या अर्थाने की त्यांचं इतिहासच या शब्दाला ओळख प्राप्त करून देत आहे. बातमी आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश झाला आहे. कृष्णा हेगडे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. हेगडे यांना शिंदे गटात प्रवेश करताना उपनेते पद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
माजी आमदार कृष्णा हेगडे हे आधी काँग्रेसमध्ये होते. ते काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे समर्थक मानले जात होते. काँग्रेसच्या तिकीटावर ते विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडूनही आले होते. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यात पुन्हा सत्तांतर झाल्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि शिवसेना शिंदे गट अशा रीतीने ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्या गटात जाण्याचा गमतीदार मार्ग माजी आमदार हेगडे यांनी शोधला आहे. मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघात कृष्णा हेगडे यांचं प्रभुत्व आहे. त्यामुळे शिंदे गटाची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू झाली असल्याचे दिसून येत आहे.