“१० वर्षांत पहिल्यांदा असं घडलं आहे की मी एक महिना माझ्या बॅटला हातही लावला नाही. मला जाणवलं की काही काळ मी खोटी ऊर्जा (आक्रमकता) दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. …”
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने एक महिन्याच्या विश्रांतीपूर्वी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेल्याची कबुली दिली आहे. यादरम्यान त्याने असेही सांगितले की या ब्रेकमध्ये त्याने महिनाभर त्याच्या बॅटला हातही लावला नाही. गेल्या १० वर्षात विराटने महिनाभर त्याची बॅट हातात न घेण्याची ही पहिलीच वेळ होती. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेदरम्यान विराटला ब्रेक देण्यात आला होता आणि आता कोहली आशिया कपमध्ये पुनरागमन करत आहे.
विराटला २०१९ पासून एकही शतक झळकावता आलेले नाही आणि त्याच्या खराब फॉर्मबद्दल सतत चर्चा होत होती. यादरम्यान विराट अनेकवेळा त्याच्या कामाच्या बोजावरही बोलला होता, पण कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. याच कारणामुळे कोहलीने तीन महिन्यांतच भारताचे तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले. आता ब्रेकनंतर विराट पुनरागमन करत आहे.
एका स्पोर्ट्स चॅनलशी संवाद साधताना विराट म्हणाला, “१० वर्षांत पहिल्यांदा असं घडलं आहे की मी एक महिना माझ्या बॅटला हातही लावला नाही. मला जाणवलं की काही काळ मी खोटी ऊर्जा (आक्रमकता) दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्वतःला सांगत होतो तुझ्यात तेवढी उर्जा आहे, पण माझे शरीर मला थांबायला सांगत होते. माझे मन मला विश्रांती घेण्यास आणि एक पाऊल मागे घेण्यास सांगत होते.”
विराट पुढे म्हणाला, “मला नेहमीच अशी व्यक्ती म्हणून पाहिले गेले आहे जी मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे आणि मी आहे. पण, प्रत्येकाची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा तुम्हाला माहित असली पाहिजे. नाहीतर गोष्टी तुमच्यासाठी हानिकारक ठरतील. यादरम्यान मला खूप काही शिकायला मिळाले. ज्या गोष्टी मला स्वीकारायच्या नव्हत्या. परंतु त्या समोर आल्या तेव्हा मी त्या स्वीकारल्या.”
विराट मानसिकदृष्ट्या खचला होता
यादरम्यान विराट कोहलीने आपण मानसिकदृष्ट्या खचल्याचे कबूल केले. ते कबूल करायला लाज वाटत नाही असे तो म्हणाला. ही खूप सोपी गोष्ट आहे, परंतु आम्ही याबद्दल बोलत नाही. आम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत दिसायचे नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, बलवान असल्याचे ढोंग करणे अशक्तपणा मान्य करण्यापेक्षा वाईट आहे असंही विराट यावेळी बोलताना म्हणाला.