महागाई, बेरोजगारी आणि जीएसटी दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आज देशव्यापी निदर्शने
राहुल गांधी,प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना घेतले ताब्यात
देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटी दरातील वाढीविरोधात काँग्रेसकडून आज देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. खासदारांच्या निषेधावर पोलिसांनी राहुल गांधी आणि खासदार शशी थरूर यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. यानंतर इतर खासदार विजय चौकात धरणे धरून बसले.
पोलिसांनी कलम 144 चे कारण देत मोर्चाला परवानगी दिली नाही. सकाळी ११ वाजता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा काढला . पोलिसांनी त्यांना विजय चौकात रोखले आणि परिसरात कलम 144 लागू केल्याचे कारण देत मोर्चा बेकायदेशीर ठरविला. त्यावरून काँग्रेस खासदारांची पोलिसांशी झटापट झाली. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, शशी थरूर यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले.
याबाबत इतर खासदार धरणे धरून बसले, मात्र पोलिसांनी त्यांनाही हटवले.
याबाबत राहुल गांधी म्हणाले की, महागाईला विरोध करणाऱ्या काँग्रेस खासदारांना पोलिसांनी धक्काबुक्की केली आणि काहींना मारहाणही करण्यात आली. लोकशाहीची हत्या होत असल्याचे तुम्ही सर्वजण पाहत आहात. महागाईवर हे लोक प्रदर्शन करू देत नाहीत. आंदोलन कर्त्यांना शांततेत राष्ट्रपती भवनात जायचे होते, पण पोलिसांनी परवानगी दिली नाही, असे त्याने सांगितले. राहुल गांधींनंतर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ते काँग्रेस कार्यालयाबाहेर निदर्शने करत होते. अटकेत असलेले काँग्रेस खासदार दीपेंद्रसिंग हुडा म्हणाले, “आम्हाला महागाई आणि बेरोजगारीवर आवाज उठवायचा आहे, पण सरकार आम्हाला दडपत आहेत. हे सरकार तरुणांच्या भवितव्याशी खेळत आहे.”
काँग्रेसने यावेळी विरोधासाठी वेगळी योजना आखली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी काळ्या कपड्यात संसदेत पोहोचून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर काळ्या कपड्यांमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यासाठी खासदार राष्ट्रपती भवनावर पोहोचले. दिल्लीत पाऊस पडल्यानंतरही काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला नाही त्यांनी जोरदार निषेध केला.