ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची देणगी!
पुणे, | पुना जेरियॅट्रीक केअर सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगी स्वरुपात देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या महाराष्ट्र प्रांतातर्फे हि देणगी देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांची आरोगयाची गरज लक्षात घेऊन व पुना जेरियॅट्रीक संस्थे मार्फत केल्या जाणाऱ्या गुणात्मक कामाचा आढावा घेऊन संस्थेला चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगी स्वरूपात देण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कृत्रिम आक्सिजनची गरज लक्षात आली. त्यातच विविध आजारांशी लढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा कृत्रिम आक्सिजनची आवश्यकता भासते. अशावेळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर महत्वाची भुमिका बजावतात.
जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताच्या पुणे महानगराचे कार्यवाह अश्विनकुमार उपाध्ये यांनी चार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुना जेरियॅट्रीक केअर सेंटरचे संस्थापक डॉ. संतोष कनशेट्टे यांच्याकडे सुपुर्द केले. इन्व्हा केअर या अमेरिकन कंपनीने हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तयार केले असून ताशी पाच लिटर ऑक्सिजन निर्मिती करण्याची त्यांची क्षमता आहे. सध्या सुरु असलेला पावसाळा आणि त्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे अनेकदा त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अशा वेळी या ऑक्सीजन कॉन्संट्रेटरचा उपयोग महत्वाचा ठरणार आहे असे मत आश्विनकुमार उपाध्ये यांनी व्यक्त केले. पुना जेरियॅट्रीक केअर सेंटरतर्फे डॉ. संतोष डॉ. संतोष कनशेट्टे यांनी जनकल्याण समितीचे मनापासून आभार मानले व या देणगीमुळे अनेक वृद्धयांचा बहूमूल्य असा फायदा होणार आहे असे मत व्यक्त केले. यावेळी जनकल्याण समितीच्या पुणे महानगर कार्यालय प्रमुख गौरी टोपकर याही उपस्थित होत्या.