केवळ ठरावच केला नाही तर अंमलबजावणीही केली : धनगरवाडी गावात क्रांतिकारी पर्वाला सुरुवात
जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावाने विधवा अनिष्ट प्रथा केल्या बंद
पतीच्या निधनानंतर महिलेचे कुंकू पुसणे ,पदर फाडणे , बांगड्या फोडणे आदी अनिष्ट प्रथांना आज महिलांनीच कडाडून विरोध केला. जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी गावात आजपासून (शुक्रवार) एका नवीन क्रांतिकारी पर्वाला सुरुवात झाली आहे. धनगरवाडी गावचे उपसरपंच राजेंद्र शेळके यांचे चुलते महादेव अर्जुन शेळके (वय-६८) यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी सकाळी येथील स्मशानभूमीत झाला.यावेळी कपाळाचे कुंकू पुसणे, पायातील जोडवी काढणे, बांगड्या फोडणे, साडीचा पदर कापणे असे कोणतेही प्रकार त्यांच्या पत्नी प्रमिला शेळके यांच्याबाबतीत केले नाही. विशेष म्हणजे गावातील इतर महिलांनीच या अनिष्ट रूढी व परंपरा करायच्या नाहीत असा पवित्रा यावेळी घेतला.यावेळी इतर महिलांनी या प्रथा न करण्यासाठी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचे तालुक्यासह विविध भागातून स्वागत होत आहे.
विधवा प्रथा बंद करण्यासाठी धनगरवाडी ग्रामपंचायतने वाटपौर्णिमेच्या दिवशी ठराव घेतला होता.याच दिवशी विधवा महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी विशेष वटपौर्णिमेचे आयोजन देखील केले होते.विधवा महिला मातांच्या हस्ते वडाचे झाडाचे पूजन केले.वडाच्या झाडाला धागा गुंडाळून पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेचा हा सण साजरा केला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित बैठकीत सर्व महिलांच्या उपस्थितीत महिलांनी हा ठराव मंजूर केल्याने तसेच विधवा मातांसाठी आयोजित केलेल्या वटपौर्णिमेचा प्रभाव आज या निमित्ताने दिसून आला.विधवा मातांसाठी विशेष वटपौर्णिमेचे आयोजन करून त्यांना साडी चोळी भेट देऊन त्यांचा सन्मान करणारे जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे. या प्रसंगामुळे धनगरवाडी गावच्या महिलांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
“खरं तर अशा दुःखद प्रसंगात विधवा प्रथांच्या बाबतीत बोलणे किंवा त्या घरातील व्यक्तींना सांगणे योग्य वाटत नाही .पण धनगरवाडीतील या प्रसंगात महिलांनी विशेष पुढाकार घेऊन हा पायंडा पाडला आहे, ही धनगरवाडी गावासाठी एका चांगल्या कार्याची नांदी आहे.” – महेश शेळके, सरपंच
“दुःखद घटनांमध्ये भावनिक होऊन न जाता माणूस म्हणून आपण विचार करायला हवा.आपण प्रत्येक जण अशा प्रसंगात भावूक होऊन जुन्या परंपरांचे पालन करत असतो.कोणाच्याही घरात अशी काही दुर्घटना घडल्यास पुरुषांपेक्षा या प्रथा टाळण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा. – राजेंद्र शेळके , उपसरपंच