बेंगळुरू | लवकरच “राष्ट्रीय स्तरावर बदल” होईल असे वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले आहे. 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकीवर फोकस असलेल्या राव यांच्या विरोधी नेत्यांसोबतच्या बैठकींच्या मालिकेनंतर पंतप्रधान मोदी आणि राव यांच्यात जुगलबंदी रंगली आहे. मागील आठवड्यात केसीआर यांनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा एचडी कुमारस्वामी यांची बंगळुरू येथे भेट घेतली. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेलंगणाची राजधानी हैदराबादला भेट देत होते.
पंतप्रधान मोदींनी हैदराबादमध्ये केसीआर यांच्यावर निशाणा साधला. वंशवादी राजकारण अशी टीका मोदींनी राव यांच्यावर केली होती. यावर केसीआर म्हणाले “भाषणबाजी आश्वासने खूप दिली जातात पण वास्तव काय? उद्योगधंदे बंद पडत आहेत, जीडीपी घसरत आहे, महागाई वाढत आहे. शेतकरी, दलित आणि आदिवासी नाखूष आहेत.
2024 मध्ये भाजपविरोधात संयुक्त आघाडी मजबूत करण्याच्या प्रयत्नात केसीआर देशभरातील विरोधी नेत्यांच्या भेटी घेत आहेत. मी देवेगौडा आणि एचडी कुमारस्वामी यांना भेटलो, आम्ही सर्व गोष्टींवर चर्चा केली. राष्ट्रीय स्तरावर बदल होणार असून तो कोणीही रोखू शकणार नाही. भारत बदलेल. भारत बदललाच पाहिजे. देशाची स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत,” केसीआर म्हणाले. “दोन-तीन महिन्यांनंतर तुम्हाला खळबळजनक बातम्या मिळतील,” असेही राव यांनी स्पष्ट केले.
याआधी गुरुवारी, केसीआर आणि त्यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला फटकारताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, वेगळ्या राज्यासाठी संघर्ष केवळ एका कुटुंबाने राज्य करण्यासाठी नाही. “परिवारवादी पक्ष फक्त स्वतःच्या विकासाचा विचार करतात. या पक्षांना गरीब जनतेची पर्वा नाही, एकच कुटुंब सत्तेत कसे राहून जमेल? लुबाडणूक कशी करता येईल? यावर त्यांचे राजकारण केंद्रित आहे. त्यांना लोकांचा विकास यात काही रस नाही. असे पंतप्रधान मोदी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. केसीआरचे नाव न घेता, पंतप्रधान म्हणाले: “तेलंगणातील लोकांनी त्यांच्यापासून सावध असले पाहिजे ज्यांच्या अंधश्रद्धा त्यांच्या प्रशासनाच्या मार्गात येतात.”
केसीआर यांनी मोदींना थेट उत्तर दिले नाही परंतु त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते कृशांक माने यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले “पंतप्रधान फक्त परिवारवादाबद्दल बोलले . जर तसे असेल तर, भारताच्या क्रिकेटचे नेतृत्व करण्यासाठी जय शाह (केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा) कोण आहे? त्यांनी राजनाथ सिंह आणि त्यांच्या मुलाचा परिवारवादावर विश्वास नसेल तर त्यांची हकालपट्टी करावी . ते तेलंगणाबद्दल का बोलत नाहीत?