सोमय्यांनी केलेला घोटाळा आजवरचा सर्वात मोठा गुन्हा, बोफोर्सपेक्षा गंभीर!
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना अडचणीत आणणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आता स्वत:च अडचणीत येण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाची विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी लोकवर्गणीतून जमा केला होता पण हा निधी राजभवनापर्यंत पोहोचला नसल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोमय्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयएनएस विक्रांत युद्धनौकेला ऐतिहासिक महत्त्व आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात युद्धकाळात तिनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१३-१४ मध्ये जहाज भंगारात न जाता त्याचे संग्रहालय व्हावे अशी भूमिका सोमय्यांनी घेतली होती. आयएएनएस विक्रांत वाचवण्यासाठी त्यांनी निधीही उभारला होता. पण हा निधी राजभवनापर्यंत पोहोचलाच नसल्याची माहिती माहिती अधिकारीतून समोर आली आहे. या घोटाळ्याप्रकरणी नौदलाचे काही माजी सैनिक लवकरच पोलीस तक्रार दाखल करणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
याबाबत, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले का हे जाणून घेण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून माहिती मागवली होती. त्यात राज्यपाल कार्यालयाकडून असे कोणतेही पैसे जमा झाले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
१९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका “आयएनएस विक्रांत’चा ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी, जहाज भंगारात न जाता त्याचे संग्रहालयात रुपांतर व्हावे यासाठी किरीट सौमय्यांनी पैसे जमा केले होते.
पण राज्यपाल कार्यालयात हे पैसे जमाच झाले नाहीत तर हे पैसे गेले कुठे? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. मग सोमय्यांनी पैसे निवडणूकीसाठी वापरले का, की मुलाच्या कंपनीत गुंतवले, असेही सांगत सोमय्या चार्टर्ड अकाऊंटटं असल्याने असा पैसा कुठे जिरवायचा, हे त्यांना चांगलच माहित आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. किरीट सोमय्यांनी देशद्रोहाचा गुन्हा केला आहे, राज्यातील तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी राऊतांनी केली आहे.