जुन्नर | उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव भागातील हापूस आंबा चव, रंग, वास या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुराणकाळातील ग्रंथांपासून ते मध्ययुगीन आणि शिवकालीन ग्रंथांमधेही इथल्या आंब्याच्या शेती संदर्भात उल्लेख आहेत. याचाच आधार घेऊन इथल्या आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून भौगोलिक मानांकन घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी शास्त्रज्ञांची एक टीम तांत्रिक बाबींवर काम करत आहे. इथल्या आंब्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यानंतर जुन्नरच्या पर्यटनातही भर पडणार आहे.
छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, ख्रिस्तपूर्व काळात सातवाहन साम्राज्याचा युरोपमधील रोमन साम्राज्यासोबत जिथून व्यापार चालायचा तो नाणेघाट आणि निजामशाही आणि मुघल साम्राज्याच्या खुणा दाखवणारे महाल अशा बर्याच गोष्टी जुन्नर परिसराला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. आता यामध्ये इथल्या हापूस आंब्याचीही भर पडणार आहे. या जुन्नर आणि आंबेगाव परिसरात येणारा हापूस आंबा इतर ठिकाणी पिकणाऱ्या हापूस आंब्यापेक्षा निराळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असल्याने त्याचे भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. भौगोलिक मानांकनाची ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रावर सोपवण्यात आली असून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून २६ लक्ष ४८ हजार रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे.
हापूस म्हटलं की महाराष्ट्रात कोकण रत्नागिरी आणि देवगड परिसरातील आंबा असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. मात्र जुन्नर परिसरातील आंबा कोकणातील आंब्यापेक्षा वेगळा असल्याचं आणि तरीही तो हापूस याच जातकुळीतील असल्याचं शास्त्रीय तपासण्यांमधे सिद्ध झालं आहे. आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटकडून करण्यात आलेल्या संशोधनात शिवनेरी हापूसचे डीएनए प्रोफायलिंग हे रत्नागिरी आणि देवगड हापूसपेक्षा वेगळं असल्याचं आढळून आलं आहे.
* प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट्स, साखरेचे प्रमाण, कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण या सर्वच बाबतीत कोकण हापूस आणि शिवनेरी हापूसमध्ये फरक आहे.
*कोकणातील लाल माती आणि समुद्रावरुन येणारे खारे वारे यांचा परिणाम तिथल्या हापूसच्या चवीवर होतो तर जुन्नर भागातील कोरडी हवा, काळी माती आणि कोकणच्या तुलनेत पावसाचे कमी प्रमाण याचा परिणाम इथल्या हापूसवर होतो.
देशात आतापर्यंत आंब्याच्या दहा प्रजातींना भौगोलिक मानांकन देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील कोकण हापूस आणि मराठवाड्यातील केशर आंब्याचा त्यामध्ये समावेश आहे. नजिकच्या काळात त्यामध्ये शिवनेरी हापूसची भर पडल्यास इथल्या आंब्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि अनेक ऐतिहासिक ठिकाणांबरोबरच इथला हा शिवनेरी हापूस देखील पर्यटकांच्या आकर्षणाच केंद्र ठरणार आहे.