बिबट सफारी प्रकल्प जुन्नर मध्येच! फोनद्वारे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन – माजी आमदार सोनवणे यांचे उपोषण अखेर मागे
नारायणगाव | ‘बिबट सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा,’ या मागणीसाठी माजी आमदार सोनवणे यांनी जुन्नर येथे २२ मार्च पासून सुरू केलेले उपोषण अखेर काल मागे घेतले. काल उपोषणाच्या चौथ्या दिवशी “बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच होणार,” असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी फोनवरून दिले. या आश्वासनानंतर माजी आमदार सोनवणे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. जुन्नरच्या बिबट सफारीवरुन जुन्नर तालुक्यातील राजकारण तापले होते. आमदार अतुल बेनके (Atul Benke)यांनी या बिबट्या सफारीचा सर्व्हे सुरु झाला आहे असे सांगत त्यासंदर्भात वरीष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीची वनविभागाची प्रेसनोट देखील त्यांनी जाहीर केली होती, तर दुसरीकडे माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane)यांनी बिबट सफारीचा सर्व्हे सुरू झाला हे आमदार बेनके यांचे सर्व थोतांड असल्याचे म्हणत उपोषण सुरू केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव खारगे यांनी माजी आमदार सोनवणे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने केले. ”बिबट सफारी संदर्भात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मला फोन आला होता. मात्र जुन्नरच्या बिबट सफारी मंजुरीचा लेखी आदेश येईपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार आहे. बिबट सफारीसाठी मी बलिदान करायला तयार आहे,” अशी ठाम भूमिका माजी आमदार शरद सोनवणे यांनी घेतली होती. मात्र काल फोनद्वारे मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिलेल्या आश्वासनानंतर सोनवणेंनी उपोषण मागे घेतले.’ ‘पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीच्या माध्यमातून बिबट सफारीसाठी निधी देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आश्वासित केले त्याचबरोबर प्रकल्पासाठी जागा निश्चित करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले असताना माजी आमदार सोनवणे यांचे हे उपोषण हा राजकीय स्टंट आहे असा आरोप आमदार बेनके यांनी केला आहे.