बिबट सफारीसाठी सर्वस्व पणाला लावणार – अतुल बेनके; बिबट सफारी समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

जुन्नर | बिबट सफारी प्रकल्प समर्थनार्थ बिबट्या जुन्नरचा … सफारी पण जुन्नरलाच … हा संदेश देत स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेच्या वतीने जुन्नर याठिकाणी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेला जुन्नरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘बिबट सफारी’ प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा या मागणीच्या समर्थनार्थ स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेच्या वतीने जुन्नर येथे सह्यांची मोहीम राबविण्यात आली आहे.

जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनीही या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेच्या साईन बोर्डवर सही करत मीही या मोहिमेत सहभागी आहे. बिबट सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा यासाठी मी हा लढा शेवटपर्यंत लढणार आहे. बिबट सफारीसाठी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे. समस्त जुन्नरकरांच्या भावनेचा आदर ठेवून हा लढा लढण्यासाठी मी सर्वस्वी प्रयत्न करणार आहे असे आमदार बेनके यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. सही करताना आमदार बेनके यांनी बोर्डवर एक वाक्य लिहिले, “जुन्नर बिबट सफारीसाठी सर्वस्व पणाला लावणार आहे”, असे वाक्य लिहीत त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या जुन्नर तालुक्यात बिबट सफारी प्रकल्प तालुक्यातच व्हावा अशी जनभावना आहे. सोशल मीडिया, सामाजिक राजकीय वर्तुळातही हा विषय प्राधान्याने चर्चेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.