बिबट सफारी प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा, आ.अतुल बेनके यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र
पुणे | अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पात बिबट्या सफारी प्रकल्पासाठी ६० कोटींची तरतूद करण्यात आली आणि हि बिबट सफारी बारामतीला होणार अशी घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे जुन्नर तालुक्यात या प्रकल्पाबाबत सामान्य जनतेकडून आणि सर्व पक्षीय नेत्यांकडून हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. जुन्नरकरांना शासनाचा हा निर्णय आवडला नसून याबाबत लोकांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. बिबट सफारी हा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असे मत विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्रातून कळविले आहे. हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा. या मागणीचे पत्र मंगळवारी (दि.१५ मार्च) आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिले आहे.
जुन्नरची प्रस्तावित बिबट्या सफारी बारामतीला स्थलांतरित झाल्यामुळे जुन्नर तालुक्यात सामान्य जनतेच्या मनात मोठा रोष निर्माण झाला आहे. या बिबट सफारी प्रकल्पाची मागणी २०१६ ला शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली होती. मात्र, अर्थसंकल्पात बारामतीमध्ये बिबट सफारी होणार्व त्यासाठी निधीच्या तरतूदीची घोषणा झाल्याने जुन्नर तालुका शिवसेना व राष्ट्रवादी मध्ये राजकीय संघर्ष सुरु झाला. या संदर्भात लोकभावनेचा आदर करत आमदार बेनके यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवारांना पत्र पाठवले असून, त्यामध्ये बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
या पत्रात बेनके म्हणाले, “२०१६ साली बिबट सफारी प्रकल्प जुन्नरला व्हावा, यासाठी तत्कालीन वनमंत्री यांच्या समवेत बैठक झाली होती. त्यास शासनाने अनुकूलता दर्शवून संबधित विभागाचे सचिव, वास्तुविशारद यांना आंबेगव्हाण येथील जागेची पाहणी करण्यासाठी व डिपीआरसाठी दिड कोटी रुपये मंजूर केले. त्यातील ६५ लाख देण्यात येणार होते. मात्र शासनाने ते दिले नाहीत आणि हा प्रकल्प बारगळला गेला. तरीही जनतेला या प्रकल्पाबाबत उत्सुकता होती. हे मुद्दे घेऊन मी निवडणुक लढवली. परंतू अर्थसंकल्पामध्ये हा प्रकल्प बारामतीला होणार या घोषणेमुळे तालुक्यातील जनता व्यथित झाली. शासनाचे धोरण जुन्नरला अनुकूल असताना, हा प्रकल्प बारामतीला नेण्याचा घाट का घातला जात आहे?, अशी लोकभावना झाली आहे. यामुळे जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातच व्हावा, अशी माझ्यासह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी आहे. त्याचा सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी बेनकें यांनी पत्रामधून केली आहे.