मेंगडेवाडी सोसायटीवर अरुण गिरेंचे निर्विवाद वर्चस्व!
मेंगडेवाडी ता.आंबेगाव येथील श्री.गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेने ११ जागा पैकी ६ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच शिवसेना तालुका प्रमुख अरुण गिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ही निवडणूक लढवली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाच जागा जिंकल्या आहे तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी एकमेव उमेदवार असल्यानं नवनाथ कोरके बिनविरोध निवडून आले आहेत.
अरुण गिरे यांच्या पत्नी सुषमा गिरे या महिला राखीव गटात उभ्या असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. दोन्ही पक्षात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. रविवारी मतदान झाले त्या नंतर सायंकाळी लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. शिवसेनेचे दशरथ बाबुराव मेंगडे, तुळशीराम महादू गवारी, तुकाराम बापू भोर, दिनकर हौशिराम मेंगडे, बन्सीराम प्रभाकर मेंगडे, सुषमा अरुण गिरे हे सहा जण निवडून आले आहेत.
तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब सावळेराम मेंगडे, धनेश यशवंत टाव्हरे, जिजाभाऊ रामभाऊ गवारी, आनंदराव गंगाराम मेंगडे, शकुंतला कैलास मेंगडे हे निवडून आले आहेत.