पिंपरी चिंचवड भाजप मध्ये खळबळ, अखेर नगरसेवक रवि लांडगे यांचंही ‘ठरलं’
पिंपरी | गेल्या महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून येऊन भाजपच्या विजयाचे खाते उघडणारे नगरसेवक रवी लांडगे यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. आज (दि.५ फेब्रु.) शनिवारी त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवले आहे. लांडगे यांच्या राजीनाम्याने पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप झाला आहे, तोही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याआधीच हा भूकंप झाला आहे. रवी लांडगे यांच्या राजीनाम्याने भोसरी विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसला आहे.
महापालिका निवडणुकीच्या काही दिवस आधीपासून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये सुरू झालेली ‘गळती’ थांबण्याचे नाव घेत नाहीये. पक्षाचे नगरसेवक रोज राजीनामे देत आहेत. आतापर्यंत वसंत बोराटे, चंदा लोखंडे, तुषार कामठे, माया बारणे यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत. या धक्क्यातून अजून भाजपही सावरू शकला नाही तोच आज नगरसेवक रवी लांडगे यांनी थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा धुव्वा उडवला. त्यानंतर रवी लांडगे हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि भाजपच्या विजयाचे खाते उघडणारे नगरसेवक सिद्ध झाले. आतापर्यंत राजीनामे दिलेल्या नगरसेवकांप्रमाणेच त्यांनीही पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर आणि नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
नगरसेवक रवी लांडगे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, माझे वडील दिवंगत बाबासाहेब लांडगे आणि माझे काका दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी लहानपणापासून भाजपसाठी काम करू लागलो. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे अस्तित्व टिकवण्यासाठी माझे वडील आणि काका दोघांनीही कष्ट घेतले आहेत. त्यांच्या अडचणी मी माझ्या लहानपणी पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत. तेव्हापासून भाजपचे संस्कार माझ्यात रुजले आहेत. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा राजकीय जन्म भाजपमधून झाला आहे. पक्षात आल्यापासून मी पूर्ण निष्ठेने काम केले आहे. त्यांनी कधीही पक्षाशी गद्दारी केली नाही. भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या विकासासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी पक्षातील जुन्या निष्ठावंतांना बळ दिले आणि नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेतले. पक्षाचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कधीही जुने-नवे असा भेदभाव केला नाही. भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून 2017 च्या महापालिका निवडणुकीत भोसरीच्या धावडेवस्ती प्रभागातून मी बिनविरोध निवडून आलो. या पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने लढा दिला, मात्र जनतेला न्याय देण्यासाठी पक्ष म्हणून भक्कम पाठबळ हवे आहे, जे मला कधीच मिळाले नाही असं लांडगे यांनी म्हटले आहे.