तपास यंत्रणा झाल्या कमळीच्या सालगडी … नवाब मालिकांच्या चौकशीवरून खा.अमोल कोल्हे यांचा भाजपवर निशाणा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येत आहे. नवाब मलिक बुधवारी सकाळी या चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी अगोदरच समन्स पाठवले होते. त्यानुसार आज नवाब मलिक (Nawab Malik) ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असताना खा.अमोल कोल्हे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून खा.कोल्हे यांनी भाजपवर व तपास यंत्रणांवर काव्यात्मक टीका केली आहे. त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की,

सत्तेच्या माडीसाठी
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा…
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी

अशी काव्यात्मक टीका खा.अमोल कोल्हे यांनी केली आहे.

भाजपा सत्तेसाठी ईडीचा वापर करत असून कोणतेही ठोस कारण नसताना मंत्र्यांच्या घरावर धाडी मारल्या जात आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता भाजपाला बघवत नसल्याने ते नवनवीन कुरापती करत आहेत, असं कोल्हे म्हणाले आहेत. शिवाय तपासयंत्रणा या भाजपाच्या झाल्या असून तुमच्या नेत्यांच्या कोणत्याच भानगडी नाहीत का?, असा सवाल केला आहे. तसेच तुम्हीही कितीही प्रयत्न केलेत तरी राष्ट्रवादीचा रांगडा गडी तुम्हाला पुरून उरेल, असं अमोल कोल्हेंनी सुनावलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.