शहरभर अजितदादांच्या कौतुकाचे फलक ; चक्क भाजप नगरसेवकाने लावले फलक
पिंपरी चिंचवड | भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी खुलेआम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कौतुकाचे फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहरात लावले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रस्ते सफाईच्या कामाचे टेंडर मिळवण्यासाठी बोगस ‘बँक हमीपत्र’ सादर करुन महापालिकेची फसवणूक करणाऱ्या सिक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट विरोधात काही दिवसांपूर्वी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक तुषार कामठे यांनी या विषया संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश आले. या प्रकरणाच्या संदर्भात प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली. नगरसेवक तुषार कामठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही हि कागदपत्रे सादर केली होती. अजित पवारांनी चुकीच्या कामाला पाठिशी न घालण्याचे सांगत आयुक्त राजेश पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला. त्यानंतर कामठे यांनी अजितदादांचे मनापासून आभार मानले होते.
या प्रकरणात अजितदादांनी चुकीच्या कामांना पाठिशी न घालता निःपक्षपाती निर्णय घेतला. त्यामुळेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचे ५५ कोटी रु. वाचवले. भ्रष्टाचार नष्ट झालाच पाहिजे मग तो भ्रष्टाचारी कुणीही असेना. दादा आपले मनस्वी आभार अशा आशयाचे फलक पिंपरी चिंचवड शहरात तुषार कामठे यांनी लावले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरही या फलकांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी खुलेआम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कौतुकाचे फ्लेक्स लावले आहेत. या फलकांची जोरदार चर्चा सध्या पिंपरी चिंचवड शहरात आणि सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.