शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आता पीएमपीएमएल बससेवा सुरू होणार आहे. किल्ले शिवनेरी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील या पर्यटनस्थळी जाण्यासाठी आता पिंपरी चिंचवड मधील भोसरी डेपो ते किल्ले शिवनेरी जुन्नर अशी बससेवा सुरू होणार आहे.
या बससेवेच्या मागणीसाठी जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांना पत्र लिहून भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर अशी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी आ.बेनके यांनी केली होती. यामागणीचा विचार करत पीएमपीएमएल प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे.येत्या शुक्रवारी दि.११ फेब्रुवारी २०२२ रोजी भोसरी ते किल्ले शिवनेरी या पहिल्या बस चे होणार आगमन जुन्नर तालुक्यात होणार आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातून आणि देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी, जुन्नर, नारायणगाव, ओझर, लेण्याद्री येथे येत असतात. नारायणगाव, जुन्नर परिसरातील नागरिक व कामगार विद्यार्थी हे देखील पुणे पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करत आहेत. तालुक्यात पर्यटनाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटक नागरिकांची व भाविकांची गैरसोय लक्षात घेता भोसरी ते जुन्नर मार्गावर पीएमपीएमएलची बससेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी आ.बेनके यांनी पीएमपीएमएल कडे केली होती. त्यानंतर पीएमपीएमएल प्रशासनाने भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर या मार्गाचा सर्व्हे केला. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचीही भेट आ.बेनके यांनी घेतली होती. तसेच पीएमपीएमएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील चर्चा बेनके यांनी केली होती. या मागणीची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. येत्या शुक्रवारी दि.११/०२/२०२२ रोजी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर या बससेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील समस्त जुन्नरकरांना हि शिवजयंती निमित्ताने भेट मिळाली आहे. आमदार अतुल बेनके यांनी यानिमित्ताने समस्त जुन्नरकरांचे अभिनंदन केले आहे.