परराष्ट्र धोरणावरून राहुल गांधींनी सरकारला केलं सतर्क; गरिबी, असंघटित क्षेत्र आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान सांगितले की, यूपीए सरकारने आपल्या कार्यकाळात 27 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आणि सध्याच्या मोदी सरकारने 23 कोटी लोकांना पुन्हा दारिद्र्यरेषेखाली ढकलून दिले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांच्या वतीने बोलण्यासाठी उभे राहिलेल्या राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी सरकारने रोजगाराच्या संधी संपवल्या, गरीब आणि श्रीमंतांमधील असमानतेची दरी वाढवली, लघु आणि मध्यम उद्योगांना उद्ध्वस्त करण्यात आले आहे आणि परराष्ट्र धोरणातील धोरणात्मक चुका केल्याचा गंभीर आरोप राहूल गांधींनी केला. या भाषणात राहुल गांधींनी एकामागून एक असे अनेक आरोप केंद्र सरकारवर केले.
राहुल गांधी म्हणाले, “आज देशात दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत. एक श्रीमंतांचा आणि दुसरा गरीबांचा हिंदुस्थान. या दोन हिंदूंमधील दरी वाढत आहे. गरीब हिंदुस्थानात आज रोजगार नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीबद्दल एक शब्दही नाही. 2021 मध्ये 3 कोटी तरुणांनी रोजगार गमावला आहे, 50 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आज भारतात आहे. तुम्ही मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया बद्दल बोललात पण आमच्या तरुणांना जो रोजगार मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. या सरकारच्या कार्यकाळात भारतातील 84% लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे आणि ते वेगाने गरिबीकडे वाटचाल करत आहेत. काँग्रेसने 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले होते आणि या सरकारने 23 कोटी लोकांना तू पुन्हा गरिबीमध्ये ढकलले आहे.” ते पुढे म्हणाले, “देशातील सर्व व्यवसाय काही मोजक्या लोकांच्या हाती देऊन मक्तेदारी निर्माण केली जात आहे. तुम्ही असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त केले आहे, तुम्ही त्यांना मदत केली असती तर उत्पादन क्षेत्र निर्माण होऊ शकले असते. तुम्ही त्यांना फसवले आणि संपवले. आज तुम्ही मेड इन इंडियाबद्दल बोलत आहात, ते भारतात बनूच शकत नाही. मेड इन इंडिया म्हणजे भारतातील छोटे आणि मध्यम उद्योग आहेत, ते तुम्ही नष्ट केले आहेत.”
तुम्ही जो गरीब भारत बनवत आहात, तो गप्प राहणार नाही. हा भारत पाहतोय की आज भारतातील 100 श्रीमंत लोकांकडे 55 कोटी लोकांच्या संपत्ती एवढी संपत्ती आहे. त्याहून अधिक मालमत्ता आहे. लोकांपेक्षा नरेंद्र मोदींनी या काही ठराविक मर्जीतील लोकांना केले आहे. कारण ते त्यांची जाहिरात करतात त्यांचा अजेंडा राबवतात.
राहुल गांधी म्हणाले, “जेव्हा तुम्ही राजकारण्यांची हेरगिरी करण्यासाठी पेगाससचा वापर करता. पंतप्रधान इस्रायलमध्ये जातात आणि लोकांची हेरगिरी करण्यासाठी उपकरणे आणता, तेव्हा ते केरळ, तामिळनाडू, जम्मू काश्मीर सह प्रत्येक राज्याची फसवणूक करत आहेत. या सरकारने सर्व स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्या आहेत.” सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करत राहुल म्हणाले, “स्वत:ला विचारा की, प्रजासत्ताक दिनी तुम्ही कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला पाहुणे म्हणून का आमंत्रित करू शकत नाही? भारत आज पूर्णपणे एकटा आणि वेढलेला आहे. आम्ही सर्व बाजूंनी वेढलेले आहोत. श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, म्यानमार अफगाणिस्तान, चीन. पाकिस्तानला चीनच्या तावडीतून दूर ठेवणे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे सर्वात मोठे ध्येय आहे. पण तुम्ही काय केले. तुम्ही पाकिस्तानला चीनच्या हातात ढकलले आहे. हा तुमचा सर्वात मोठा गुन्हा आहे, जो तुम्ही भारतासोबत करत आहात. शत्रूच्या क्षमतेवर हलक्यात घेऊ नका, चीन नक्कीच काहीतरी योजना आखत आहे. डोकलाम आणि लडाखमध्ये त्या योजनेच्या संबंधित हालचाली किंवा कट आम्ही पाहिला आहे. हा भारतासाठी मोठा धोका आहे. तो समजून घ्या.”