राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांपासून कोल्हे यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेससह स्वपक्षीय नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर या भूमिकेवरून टीका केली जात आहे.या चित्रपटाच्या प्रदर्शनासही विरोध दर्शवला जात आहे. याबाबत खा. अमोल कोल्हे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. तरीही, राजकीय वर्तुळात याभूमिकेबाबत चर्चा आणि टीका सुरूच आहे. काँग्रेसने देखील या विषयावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी आज अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला.
काँग्रेस राष्ट्रवादीची विचारसरणी हि नथुराम गोडसे प्रवृत्तीला विरोध आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका करणं हे पक्षाच्या विचारसरणीविरोधात आहे. या भूमिकेतून हे नथुराम गोडसेचं उदात्तीकरण होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच अमोल कोल्हेंच्या या भूमिकेला आणि चित्रपटाला विरोध होत आहे. गांधी विचारांचे समर्थक असणाऱ्या तीन युवकांनी हर्षल लोहकरे, संजय झिंजाड आणि शंभूसिंह चव्हाण यांनी खा.कोल्हे यांच्या नारायणगाव येथील घरासमोर आणि कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले होते. या युवकांशी त्यांनी फोनवरून संवाद देखील साधला होता. अमोल कोल्हे यांनी मात्र हा चित्रपट केला तेव्हा मी सक्रीय राजकारणात नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं आहे.
“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. कलाकार जी भूमिका करतो त्या भूमिकेच्या विचारांशी तो सहमत असतो असे नसतं काही विचारांशी आपण सहमत असतो. तर काही विचारधारांशी सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय जीवनाशी संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असं अमोल कोल्हे म्हणाले होते.