खाजगी कोल्डस्टोरेज मधील अनधिकृत फळविक्रीवर कारवाई होणार – बाळासाहेब पाटील
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत खाजगी कोल्डस्टोअरेज मधील अनधिकृत फळ विक्री बाबत मुंबई, मंत्रालयात (मंगळवारी) बैठक संपन्न झाली. कोल्ड स्टोरेज मध्ये केवळ कृषी माल साठविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये विना परवानगी कृषी उत्पन्नाची खरेदी विक्री करू नये, मुंबई बाजार समिती आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या कार्यक्षेत्रामधील बोरिवली, गोरेगाव, दहिसर, नागपाडा, दादर, घाटकोपर अशा अनेक ठिकाणी अनधिकृत खाजगी विक्री सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील अनधिकृत खाजगी बाजार तात्काळ बंद करावे. कोल्ड स्टोरेज मधून अवैधरीतीने होणाऱ्या सफरचंद विक्रीचा दाखला देत त्या पद्धतीने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई शहर, कंदवली, बोरिवली, मालाड या ठिकाणी होणाऱ्या अवैध भाजी-पाला, फळ विक्रीमुळे बाजार समिती मधील व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान होत असून शेतकऱ्यांना हमखास भाव देणाऱ्या बाजार समित्या बंद पडत आहेत, याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
अनधिकृत विक्रीला स्थानिक पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे. याबाबत कमिटी स्थापन करून अवैध व्यवसाय करणाऱ्या कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस बरोबर मार्केटच्या बाहेरील अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करावी, या कमिटीमध्ये मुंबई आयुक्त, नवीमुंबई आयुक्त, पोलीस प्रशासन, पणन अधिकारी व बाजार समितीचे अधिकारी यांचा समावेश करण्यात येईल असे सांगितले. ज्या व्यापाऱ्यांकडे लायसन्स नाहीत त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा वर्षापासून फार मोठ्या प्रमाणावर विदेशी फळांची आयात होत आहे. काही वर्षापासून हा व्यवसाय अनधिकृतरित्या परस्पर कोल्ड स्टोरेज मधून खरेदी-विक्री होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः अफगाणिस्तान आणि इराण या देशातील व्यापारी स्वतः नवी मुंबई कोल्ड स्टोअरेज मधून थेट व्यापार करत आहेत. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांचे घाऊक मार्केट बंद पडण्याच्या मार्गावर आहे. नियमनमुक्तीचा फायदा घेऊन हे परदेशी व परप्रांतीय व्यापारी मुंबई येथे अनधिकृत रित्या व्यापार करीत आहेत या सर्व व्यापाराची कुठेच नोंद होत नाही त्याचा शासनाला फायदा होत नाही आणि शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होत नाही अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
कोल्ड स्टोरेजमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसाया वर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. जाहीर केलेल्या नियमाशिवाय कोणत्याही जागेचा उपयोग करता येणार नाही. तसेच वैध अनुज्ञप्तिशिवाय दलाल प्रक्रिया करणारा, तोलारी मापणारा सर्वेक्षक, वखारवाला या नात्याने किवा इतर कोणत्याही नात्याने काम करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार, कामगार विभागाचे आयुक्त सुरेश जाधव, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, मुंबई पोलिस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील, , नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक संजय पानसरे, अशोक वाळुंज, शंकर पिंगळे, माजी संचालक बाळासाहेब बेंडे, बाजार समिती सचिव संदीप देशमुख, उपायुक्त श्रीमती लोखंडे, उपसचिव महेंद्र म्हस्के व संबंधित अधिकारी उपस्थित होते.