महाराणा प्रताप पुतळ्याचा निधी सैनिकी शाळा उभारण्यासाठी वापरावा – इम्तियाज जलील; शिवसेनेचा मात्र विरोध
औरंगाबाद महानगरपालिकेकडून बसविण्यात येणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरून औरंगाबाद शहरातील राजकारण चांगलेच रंगले आहे. या मुद्द्यावरून आजी आणि माजी खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यांसदर्भात बोलताना खा.इम्तियाज जलील म्हणाले की, “मी महाराणा प्रताप यांना विरोध केलेला नाही. काही लोकं या वरून राजकारण करत आहेत. मी एक चांगला पर्याय सुचवला आहे. याआधीच्या पुतळ्यांपासून कोणती प्रेरणा विरोधकांनी घेतली. फक्त पुतळे आणि स्मारके उभे करण्यास माझा विरोध आहे.” हा निधी सैनिकी शाळा उभारण्यासाठी वापरावा, ग्रामीण भागात सैनिकी शाळा उभाराव्यात असे खा.इम्तियाज जलील यांनी सांगितले.
याबाबत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मत मांडले ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप हे राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळते. महानगरपालिकेने ८७ लाख रु.चे बजेट पुतळा उभा करण्यासाठी तयार केले आहे व सर्व कायदेशीर मान्यता घेतल्या आहेत. लोकसभेत मनोहर जोशी अध्यक्ष असताना दिल्लीत आम्ही महाराणा प्रतापांचा पुतळा बसवला. विरोध करणाऱ्यांनी इतिहास आधी वाचावा. पुतळा बसविण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. पुतळा बसविण्यासंदर्भात औरंगाबाद महानगरपालिकेत ठराव संमत झाला परंतु वातावरण खराब करण्यासाठी विद्यमान खासदार मुद्दे उकरून काढत आहेत. महानगरपालिका निवडणूक समोर ठेवून इम्तियाज जलील हे राजकारण करत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. पुतळा उभा केला जाणारच असे ठाम मत शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे.