नगरपंचायत निवडणूक | साताऱ्यात शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का; सत्यजित पाटणकर आणि आ. महेश शिंदे यांचे वर्चस्व
नगरपंचायत निवडणूक |साताऱ्यात शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का
सातारा जिल्ह्यातील पाटण मध्ये शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धक्का बसला असून सत्यजित पाटणकर यांनी संपूर्णपणे बाजी मारली आहे. तेथे राष्ट्रवादीने 12 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. शंभूराज देसाई यांनी पाटण मध्ये आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांच्याकडे गृहराज्यमंत्री असल्याचाही फायदा पाटण नगरपंचायतीला करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु सत्यजित पाटणकर यांच्या पॅनेलने शंभूराज देसाई यांच्या पॅनेलवर मात केली आहे.
त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शशिकांत शिंदे यांचा लागोपाठ हा तिसरा पराभव आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर जिल्हा बॅंक निवडणुकीत पराभव झाला आणि आता कोरेगाव नगरपंचायतीतही शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पॅनेलकडून शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला फार मोठा धक्का बसला आहे.
सातारा जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे 52 उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, शशिकांत शिंदे यांच्या कोरेगावात राष्ट्रवादीला फक्त चारच जागांवर विजय मिळवता आला आहे. तर आ.महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 13 जागांवर विजय मिळवला आहे.