नगरपंचायत निवडणूक | कर्जतमध्ये रोहित पवारांचा करिष्मा, भाजपचे राम शिंदे निष्प्रभ
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये (Karjat Nagar Panchayat Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. (NCP MLA Rohit Pawar) भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे (BJP Ram Shinde) यांना हा मोठा धक्का बसला आहे. या दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
कर्जतमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यातच प्रमुख लढत होती असं चित्र उभे राहिले होते. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही सुरू होत्या. कर्जत मधील राजकीय वातावरण तापले होते. आज नगरपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले. यात राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जतमध्ये 17 पैकी 12 जागांवर आणि काँग्रेस ने 3 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यानिमित्ताने कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे.