नगरपंचायत निवडणूक | बीड मध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का
नगरपंचायत निवडणूक | बीड मध्ये पंकजा मुंडेंचे वर्चस्व, धनंजय मुंडेंना धक्का
बीड जिल्ह्यातील पाचही नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी वर्चस्व राखले आहे. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसला आहे. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींवर भाजपा आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला आहे. तर वडवणी मध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव करत राष्ट्रवादीने विजय मिळवला. केजमध्ये राष्ट्रवादी, शेकाप आणि स्थानिक आघाडीने सत्ता काबीज केली आहे. राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्येचाही पराभव झाला आहे.
आष्टी, पाटोदा आणि शिरूर नगर पंचायत निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आ. सुरेश धस यांच्यावर निवडणुकीची सर्वस्वी जवाबदारी सोपवली होती. तीनही नगर पंचायतवर भाजपचा झेंडा फडकवून धस यांनी आपले वर्चस्व सिध्द केले. विशेष म्हणजे काही ठिकाणी भाजपमधील धोंडे व इतर गटांनी दिलेल्या उमेदवारांचा पराभव करून सुरेश धस यांनी उभे केलेले अपक्ष उमेदवार विजयी झाले.
आष्टी नगरपंचायतीत एकूण 17 जागांपैकी 11 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले. १ भाजप पुरस्कृत अपक्ष, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1 व अपक्ष 2 ठिकाणी विजयी झाले. शिरूर नगरपंचायतमध्ये भाजप 11, राष्ट्रवादी 4, शिवसेना 2 या प्रमाणे पक्षीय बलाबल राहिले आहे.
पाटोद्यातही विरोधी पक्षांची धुळधाण उडवत भाजपचे 9 व आ.सुरेश धस गटाचे 6 उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि काँग्रेसने एक जागा जिंकली. वडवणीत नगर पंचायतीमध्ये अटीतटीच्या लढतीत 17 पैकी भाजप 8 आणि राष्ट्रवादी 9 असा निकाल लागला. राष्ट्रवादी व आंधळे प्रणीत आघाडीने 9 जागा जिंकून काठावरचे बहुमत मिळवले.