अवसरी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी शिवसेना आक्रमक
काल आंबेगाव तालुक्यांत सुमारे ५६ कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत, अनेक रुग्णांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागत आहे. जनतेला विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे तरी देखील शिवनेरी जम्बो कोविड सेंटर बंद आहे. मग २४ कोटी खर्च झालेल्या या कोविड सेंटरचा उपयोग सर्वसामान्य जनतेला होणार नसेल तर त्याचा काय उपयोग? असा सवाल करत अरुण गिरे यांनी तालुका प्रशासन आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या कोविड सेंटर सुरू न करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुका शिवसेनेने कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते पण पुरेसे मनुष्यबळ नसल्याचं कारण देत प्रांत अधिकाऱ्यांनी कोविड सेंटर सुरू करणे शक्य नसल्याचं सांगितलं. यावरून शिवसेना तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोविड सेंटरसाठी २४ कोटी रुपये खर्च झालेत. कुठलीही ईमारत बांधली नाही फक्त संसाधनांवर इतका खर्च केला आणि कोविड सेंटर फक्त ३ महिने चालवलं. शिवसेनेच्या मागणीने कोविड सेंटर सुरू होत आहे, हे कुणाच्या तरी डोळ्यांत खुपतंय म्हणून राजकिय दबाव निर्माण करून कोविड सेंटर सुरू न करण्याचा घाट घातला की काय? असा सवाल देखील अरुण गिरे यांनी उपस्थित केला आहे.