राजीनामा सत्र सुरूच, उत्तर प्रदेश भाजपमध्ये खळबळ; 24 तासात तीन मंत्र्यांनी सोडला पक्ष
उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि योगी आदित्यनाथ यांना एकामागून एक जोरदार धक्के बसत आहेत. उत्तर प्रदेश भाजप मध्ये पक्ष सोडण्याची जणू स्पर्धाचं लागली आहे. गेल्या तीन दिवसांत तीन मंत्र्यांनी राजीनामा देत पक्ष सोडला आहे. मागास जातीचे नेते धरमसिंग सैनी यांनी आज पक्ष सोडला, विशेष म्हणजे सैनी यांनी यापूर्वी भाजप सोडत असल्याचे वृत्त ठामपणे नाकारले होते. त्याचबरोबर आणखी एक मागास जातीचे नेते मुकेश वर्मा यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि आपला राजीनामा ट्विटरवर पोस्ट केला. तीन दिवसांत भाजपमधून आमदार बाहेर पडण्याची ही आठवी घटना आहे, उत्तर प्रदेश निवडणुकीला एका महिन्यापेक्षा कमी कालावधी आहे. भाजप सोडलेल्या सर्वांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.
अवघ्या 24 तासांपूर्वी, सहारनपूरमधील नकुडचे चार वेळा आमदार राहिलेले आणि प्रमुख ओबीसी (इतर मागासवर्गीय) नेते धरमसिंह सैनी यांनी भाजप सोडल्याच्या बातम्या खोडून काढल्या होत्या. पक्ष सोडल्या बद्दल त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांनाही फटकारले होते. “स्वामी प्रसाद मौर्य यांच्या यादीत माझे नाव चुकीच्या पद्धतीने देण्यात आले होते. मला याची कल्पना नव्हती. मी भाजपमध्ये आहे आणि राहणार आहे. मी पक्ष सोडणार नाही,” असे सैनी यांनी जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते. पण नंतर, त्यांनी आपले सरकारी घर आणि सुरक्षितता परत केली.
सूत्रांचे म्हणणे आहे की योगी आदित्यनाथ यांनी देखील सैनी यांना राजी करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांच्या राजीनाम्यातही इतर सहा जणांच्या राजीनाम्याप्रमाणेच सारखाच मजकूर होता तेच अनुकरण केले आहे. अखिलेश यादव यांनी सैनी यांच्या पक्षांतराचा फोटो शेअर करून आणि त्यांचे स्वागत करून यादव यांनी खेला होबे हा हॅशटॅग वापरला. अखिलेश यादव यांनी या आठवड्यात भाजप सोडलेल्या बहुतेक आठ नेत्यांसोबतच्या त्यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ट्विटरवर पोस्ट केलेली राजीनामा पत्रे जवळपास सारखेच नियोजन आणि रणनीती दर्शवतात.