अहमदनगरला मिळणार नवीन पालकमंत्री; प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
नगरला मिळणार नवीन पालकमंत्री; प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नवीन चेहरा देणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. यामध्ये युवा आमदार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजत आहे. (Prajakt Tanpure)
सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोल्हापूर चे हसन मुश्रीफ हे आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापूर मध्ये होणाऱ्या विविध निवडणुकांसाठी मुश्रीफ यांची गरज पडणार आहे. याआधी मुश्रीफ यांनी नगरच्या पालकमंत्री पदाच्या आपल्यावरील जबाबदारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. तेव्हापासून नगरला नवीन पालकमंत्री दिला जाणार, अशी चर्चा सुरू होती. यामध्ये या जबाबदारीचा अनुभव असलेले दिलीप वळसे पाटील यांचेही नाव चर्चेत होते. त्यापाठोपाठ प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, निलेश लंके यांच्याही नावांची चर्चा होती. पालकमंत्री निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. यामध्ये मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल असा अंदाज बांधला जात आहे. कोणत्याही क्षणी या नावाची घोषणा होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.