भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत; चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते – हर्षवर्धन पाटील
मावळ | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीची चौकशी सुरु झाली आहे तसेच अनेकांना ईडीने नोटीस धाडल्या आहेत. त्यातच आता या कारवाईवर माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या चर्चेला राज्याच्या राजकारणात उधाण आले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी काल मावळमधील एका कार्यक्रमात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये का आलो, या प्रश्नाचं उत्तर यावेळी पाटील यांनी दिलं. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे नेते प्रविण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके उपस्थित होते. आम्हाला भारतीय जनता पक्षात जावं लागलं. स्टेजवर एकानं बसल्या बसल्या विचारलं भाजपमध्ये का गेलात? मी त्यांना म्हटलं, हे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये का गेला? सध्या सगळं मस्त आहे, निवांत आहे. चौकशी वगैरे काही नाही. शांत झोप लागते असं पाटील म्हणाले. पाटील यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.