नाना पटोलेंविरोधात तक्रारी दाखल करा, चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई | पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी चूक झाल्याचा आरोप पंजाब राज्य सरकारवर झाला, या घटनेची जोरदार चर्चा सध्या राष्ट्रीय राजकारणात सुरू आहे. या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस मध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. ‘पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पंजाबमध्ये झालेल्या तथाकथित गफलतीबाबत तपास चालू आहे. अशावेळी देशाच्या गृहमंत्र्यांबद्दल शंका व्यक्त करून तपासावर परिणाम होऊ शकतो व तपासात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नाबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याच्या सूचना आपण भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली आहे, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पाटील म्हणाले की, पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या बाबतीत जी घटना घडली ती अत्यंत गंभीर होती. या प्रकारामागे पंतप्रधानांच्या हत्येचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त होत आहे. देशाच्या सुरक्षिततेविषयीच्या अत्यंत गंभीर विषयावर सर्वोच्च पातळीवर चौकशी सुरू असताना नाना पटोले यांनी ही घटना नौटंकी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली तसेच या घटनेमागे गृहमंत्र्यांचा हात असल्याचा संशय जाहीरपणे व्यक्त केला. हा तपासावर प्रभाव टाकण्याचा व तपासाची दिशा भरकवटण्याचा प्रयत्न आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि पटोले यांच्यावर कारवाईची मागणी करतो. अशीही आपली मागणी असल्याचं पाटील म्हणाले.