पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा भंग झाल्याबद्दल सध्या राजकारण सुरू आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी यावरून भाजपची खिल्ली उडवली आहे. “केवळ 15 मिनिटांच्या प्रतिक्षेमुळे पंतप्रधान त्रस्त झाले. शेतकऱ्यांना शेतीविषयक कायदे रद्द होण्यासाठी वर्षभराहून अधिक काळ वाट पाहावी लागली. मोदी फक्त 15 मिनिटे हायवेवर थांबावे लागल्याने वैतागले”.
सरकारने शेतीविषयक कायदे रद्द केल्यानंतर प्रथमच पंतप्रधान पंजाबला भेट देणार होते. दोन वर्षांनंतर ते पंजाबला भेट देत होते. बुधवारी पंजाबच्या फिरोजपूरमधील उड्डाणपुलावर मोदींचा ताफा महामार्गावर रोखण्यात आला होता. त्यामुळे भटिंडा येथील राजकीय सभेला संबोधित न करताच त्यांना मागे परतावे लागले.
“मला प्रधान मंत्री साहेबांना विचारायचे आहे, आमच्या शेतकरी बांधवांनी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ तळ ठोकला होता… मला सांगा, शेतकरी तिथे दीड वर्ष राहिले. तुमच्या मीडियाने याबद्दल देशाला काहीही सांगितले नाही.
आणि काल तुम्हाला 15 मिनिटे थांबावे लागले. तर मीडियाने बातम्या दिल्या हा दुटप्पीपणा का?” असे सिद्धू यांनी म्हंटले. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फिरोजपूरमध्ये भाजपच्या सभेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर काल पंजाब मधील शेतकऱ्यांनी निषेध सभेचे नियोजन केले होते. मात्र यावेळी शेतकऱ्यांना आंदोलन करू दिले नाही, त्यानंतर शेतकऱ्यांनी महामार्गावर जाऊन ठिय्या मांडला.
काँग्रेस पक्षाने भाजपवर पंतप्रधानांच्या सुरक्षेतील तथाकथित उल्लंघना बद्दल हे एक क्षुल्लक राजकीय नाट्य भाजपने रचल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पंतप्रधानांना त्यांची फिरोजपूरमधील सभा रद्द करावी लागली कारण या सभेला लोकांची उपस्थिती नव्हती.
सिद्धू यांनीही आरोप केला आहे की, हे संपूर्ण नाट्य फिरोजपूरच्या सभेमधील मोकळ्या खुर्च्यांवरन लक्ष विचलित करण्यासाठी रचले होते.
“पंतप्रधान रिकाम्या खुर्च्यांना संबोधित करू शकले नसते. त्यामुळे कथित सुरक्षा उल्लंघन नाट्य घडवून मीडियाचे लक्ष वळवणे आणि 70000 मोकळ्या खुर्च्यांना संबोधित करताना होणारा अपमान वाचवणे हा एकमेव मार्ग होता,” असं त्यांनी ट्विट केले.
भाजपने काँग्रेसवर “हत्येच्या हेतूने” आणि पंतप्रधानांना “शारीरिक हानी” करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.