ते माझ्यासाठी मेले आहेत का? शेतकरी आंदोलकांबाबत मोदींचा सवाल; सत्यपाल मलिक यांचा खळबळजनक दावा

चंदीगड | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने केंद्र सरकारवर टीका करणारे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नरेंद्र मोदींविषयी खळबळजनक खुलासा केला आहे. जेव्हा ते कृषी कायद्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला आले होते तेव्हा त्यांच्याशी जोरदार वादावादी झाली आणि पाच मिनिटे त्यांच्यात वाद झाला. रविवारी हरियाणातील दादरी येथे एका सामाजिक कार्यक्रमाला संबोधित करताना मलिक म्हणाले, “जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटलो तेव्हा पाच मिनिटांतच माझी त्यांच्याशी भांडणे झाली. त्यांच्यात खूप अहंकार होता. जेव्हा मी त्यांना सांगितले, शेतकरी आंदोलनात 500 लोक मेले, तेव्हा ते अहंकाराने म्हणाले, ते माझ्यासाठी मेले आहेत का? तेव्हा मी म्हणालो की, हो तुझ्यासाठीच मेले आहेत, कारण तू राजा आहेस यावरून मी त्यांच्याशी भांडलो”.

मलिक पुढे म्हणाले, “पंतप्रधान म्हणाले आता तुम्ही अमित शहांना भेटा, त्यानंतर मी अमित शहांना भेटलो.” मलिक पुढे म्हणाले की, “कुत्रा मेला तरी पंतप्रधान शोकसंदेश पाठवतात, पण शेतकऱ्यांच्या मृत्यूवर ते गप्प राहिले”. केंद्राला आता कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घेण्यासाठी आणि पिकांसाठी एमएसपीला कायदेशीर चौकट देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे लागेल असं मलिक म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार आणि भाजप नेतृत्वावर ताशेरे ओढणारे सत्यपाल मलिक यांना पद जाण्याची भीती वाटत नसल्याचे वारंवार सांगितले आहे. मेघालयात नियुक्तीपूर्वी त्यांची जम्मू-काश्मीर आणि गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.