शिवसेना आणि भाजप यांच्यामधील अंतर वाढायला माझं ते वक्तव्य उपयोगी पडलं – शरद पवारांचा गौप्यस्पोट
शिवसेना आणि भाजप यांच्यामधील अंतर वाढायला माझं एक वक्तव्य फार उपयोगी पडलं, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला. विधानसभा निवडणूक झाल्यावर दिल्लीत मी भाजपला बहुमतासाठी काही मतांची कमतरता असेल तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू, असं वक्तव्य केलं. यामुळेच त्या दोघांमधली दरी वाढली आणि शिवसेना आमच्यासोबत आली असं ते म्हणाले.
शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे ‘अष्टावधानी’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासमवेत शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता. शरद पवार यांनीच अजित पवारांना फडणवीसांकडे पाठवले असं अजूनही राजकीय वर्तुळात बोललं जातं.
यावर बोलताना पवार म्हणाले की, मी त्यांना पाठवलं असतं, तर त्यांनी अर्धवट काम केलं नसतं. राज्यच बनवलं असतं. त्यामुळे या आरोपांना काही अर्थ नाही.
सेना-भाजपा युतीकडे बहुमत होतं. भाजप शिवसेना एकत्र आले असते तर आम्ही पुन्हा ५ वर्षे सत्तेबाहेर राहिलो असतो. शिवसेना भाजप मध्ये आलबेल नाही असं चित्र दिसलं. माझ्या त्या वक्तव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता पसरली. त्यामुळे शिवसेना आमच्यासोबत आली, असे ते म्हणाले.