आ.नितेश राणेंना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची टाईट फिल्डींग!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कणकवली पोलिसांनी याआधी आ.नितेश राणे यांची दोन वेळा चौकशी केली आहे. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली. सचिन सातपुतेच्या चौकशी नंतर शिवसेनेनं आक्रमक होत या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार भाजप आमदार नितेश राणे यांनाही अटक करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांना काल चौकशीसाठी कणकवली पोलिसांनी बोलावण्यात आले होते. मात्र नितेश राणे चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर आमदार राणे यांच्या घरीही सिंधुदुर्ग पोलीसांनी चौकशी केली. मात्र तिथेही ते उपस्थित नव्हते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमवेत नितेश राणे दिल्लीला जाऊ शकतात त्यामुळे पोलिसांना गोवा विमानतळावरही फिल्डींग लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज मुंबईत विधान भवनात आ. राणे उपस्थित राहिले तर मुंबई पोलिसांच्या मदतीने नितेश राणे यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला जाऊ शकतं अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठोपाठ आता नितेश राणे यांनाही अटक होणार का…? याकडेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कणकवलीत शिवसैनिक संतोष परब प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सिंधुदुर्ग बँक निवडणुकीच्या निमित्ताने कणकवलीमध्ये राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. नितेश राणे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचे नेते मला गोवण्याचा प्रयत्न आहेत, असा आरोप आ. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.